-केटील स्टेल्सेन (प्रतिनिधी-'दैगसाविजेन', नॉर्वे)एका कामासाठी मी नवी दिल्लीत होतो. नेहमीप्रमाणे शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागाकडे जायचे होते. या गरम देशात आपल्यापुरते थंड वाटायला हवे असेल, तर एअरकंडिशण्ड टॅक्सी लागते. ती बुक करावी का? या विचारात असताना जाणवले, रस्त्यावर नेहमीपेक्षा जास्त गर्दी आहे; कारण एआय-समीट सुरू झाले होते. पोलिसांनी रस्त्यावरची वाहने कमी करण्यासाठी काही रस्ते बंद केले. मग म्हटले, पायी जाणे इष्ट. नवी दिल्लीत सकाळच्या गर्दीत चालणे हा रोचक अनुभव आहे. कित्येक प्रकारचे गंध, कित्येक आवाज. नॉर्वेच्या छोट्या शांत गावातून आलेल्या माणसासाठी हे सारेच वेगळे.
नवी दिल्लीतले संमेलन कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी होते. हा विषय आला की, भविष्याची चर्चा सुरू होते; परंतु दिल्लीच्या रस्त्यांवर भविष्य आधीच अवतीर्ण झालेले दिसले. हा देश आधीच बदलला आहे. २२ वर्षाआधी भारत एक अगदी वेगळा देश होता. सर्व दिशांना गर्दी ठासून भरलेली आहे. वाहनांची संख्या वाढते आहे. प्रत्येक गोष्टीला तिचा तिचा वेग आहे. हवेची गुणवत्ता घसरली आहे. संस्कृती बदलली आहे.
२२ वर्षांपूर्वी मी भारताच्या इंग्रजी वृत्तपत्रात 'पीडीए' विषयी वाचले होते. मला वाटले की, 'पर्सनल डिजिटल असिस्टंट' असेल; परंतु भारतात याचा अर्थ 'पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन' असा होता. तरुण-तरुणी हातात हात घालून चालतील, गळामिठी करतील, चुंबन घेतील, अशा चर्चा नव्या भारतात दिसत नाहीत. कारण आता येथे या गोष्टी अंगवळणी पडल्या आहेत.
तरुण स्वतंत्र आहेत. त्यांच्या हातात स्मार्ट फोन आहे. पूर्वी तरुणी पारंपरिक पोशाख करत. अंग पूर्णपणे झाकून घेत. कानात मोठे, चमकणारे सोन्याचे झुमके, सर्वांग कपड्यांनी झाकलेले. एकेकाळी हा प्रघात होता. सुपारी किंवा तंबाखू चघळणे सामान्य होते. आता ते दिसत नाही. संस्कृतीत बदल सोपा नाही; परंतु भारतात तो झाला आहे.
माहिती तंत्रज्ञान तथा आयटी उद्योगामुळे या देशाची अर्थ-रचना वेगाने बदलली. हजारो लोकांना त्यांची पहिली कायमस्वरूपी नोकरी याच उद्योगात मिळाली. खिशात पैसे खुळखुळणारा मोठा वर्ग विकसित झाला. बाजारपेठ बहरली. आता भारतातले लोक स्मार्ट फोनने पैसे देतात. या देशात जुन्या परंपरांना आव्हान दिले जात आहे.
विशाल महत्त्वाकांक्षा बाळगल्या जात आहेत.भारत प्रगती करत आहे, हे तर स्पष्टच आहे. आता केवळ माहिती तंत्रज्ञान सेवा नव्हेत तर प्रगत तांत्रिक सेवाही येथे उपलब्ध आहेत. भारतात कृत्रिम बुद्धिमत्ताही पोहोचली आहे. प्रगतिशील विचारांना दिशा मिळाली आहे. मी ज्या लोकांना भेटलो त्यांच्यापैकी हजारोंच्या नोकऱ्या बदलल्या आहेत.
रस्त्यावर खूपच गर्दी आहे. बसेस, वाहतूक व्यवस्था, मोटारी, मोटरसायकली, सायकली, रिक्षा वेगवेगळे सामान वाहून नेताना दिसतात. ही इतकी सारी माणसे करतात त्यातल्या अनेक गोष्टी नव्या तंत्रज्ञानाने खरोखरच करायला सुरुवात केली तर या लोकांचे काय होईल? तशी शक्यता तर आता व्यक्त होतेच आहे.
आज हजारो भारतीय चालक त्यांच्या तीनचाकी रिक्षाने प्रवासी नेतात. या रिक्षावाल्यांना वातानुकूलित, चालकरहित मोटारींशी भाड्यावरून स्पर्धा करावी लागली तर? मोटारसायकल किंवा सायकलवर पोचवले जाणारे सामान ड्रोनने पोचवले गेले तर? दुकानांमध्ये कर्मचाऱ्यांच्या जागी या कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक कार्यक्षम आणि स्वस्त यंत्रमानव काम करू लागले तर?
- कष्टाच्या बाजारात नेमके काय होणार आहे याचा विचार जगभरातील लोक करत आहेत. नवे तंत्रज्ञान बदल घेऊन येईल हे सर्वांना माहीत आहे. भारतासारख्या एखाद्या देशाला अचानक मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचा सामना करावा लागला तर तो स्थिर राहणार नाही. विरोध होईल. लोक हिंसक होतील. रस्त्यावर उतरतील.आपण जन्मभर शिकत राहिले पाहिजे असे आपण म्हणतो. ते बरोबरच आहे; परंतु प्रत्येकजण काही आयटीमधील तज्ज्ञ होऊ शकत नाही. ज्यांना हे जमणार नाही, त्यांचे काय होईल?
- अगदी आजच कुणी आपल्यापासून नोकरीच्या संधी हिसकावत नाही, आपण उद्याही कामावर जाऊ; परंतु सगळ्या शक्यतांवर विचार करणे गरजेचे आहे. औद्योगिक क्रांतीच्या वेळी अनेक लोक मागे राहून गेले. अर्थात त्यावेळी नव्या नोकऱ्याही उपलब्ध झाल्या. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्रांतीमधून एकाधिकारासारख्या प्रवृत्ती निर्माण होऊ शकतात. कदाचित मूठभर लोकांना त्याचा फायदा होईल; पण बाकीच्यांचे काय?
- सांभाळून चालावे लागेल. एक जरी चूक झाली तरी आपले पाऊल मुंग्यांच्या वारुळावर पडेल, हे नक्की!
Web Summary : Artificial intelligence is rapidly changing India, impacting jobs and potentially leading to social unrest. Adapting to new technologies and addressing potential job displacement are crucial to avoid instability and ensure a fair transition for all.
Web Summary : कृत्रिम बुद्धिमत्ता तेजी से भारत को बदल रही है, नौकरियों पर असर पड़ रहा है और संभावित रूप से सामाजिक अशांति हो सकती है। नई तकनीकों के अनुकूल होना और संभावित नौकरी विस्थापन को संबोधित करना अस्थिरता से बचने और सभी के लिए एक निष्पक्ष परिवर्तन सुनिश्चित करने के लिए महत्वपूर्ण है।