शहरं
Join us  
Trending Stories
1
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
2
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
4
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
5
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
6
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
7
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
8
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
9
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
10
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
11
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
12
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
13
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
14
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
15
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
16
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
17
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
18
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
19
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
20
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

लेखः नेत्यांच्या निवडणुकीत कार्यकर्ते राबले, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत नेते कसे वागतील?

By यदू जोशी | Updated: January 3, 2025 10:07 IST

नेत्यांच्या निवडणुकीत (विधानसभा) कार्यकर्ते राब राब राबले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना परतफेडीची अपेक्षा आहे.

यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांच्या नजरा चालू महिन्याकडे लागलेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील याचिकांवर या महिन्यात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. असे म्हणतात की, त्या दिवशी या निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल. एप्रिलच्या उन्हात या निवडणुकांचा बार उडेल, असा अंदाज आहे. 

नेत्यांची निवडणूक (विधानसभा) नोव्हेंबरमध्ये झाली, त्यासाठी कार्यकर्ते राब राब राबले. आता लगेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वबळाची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भाषा नेते बोलत आहेत. महायुतीचा निर्णय स्थानिक पातळीवर होईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहेच. तिकडे खा. संजय राऊत यांनी मुंबई महापालिकेत वेगवेगळे लढण्याचा सूर लावला आहे. 

एकंदरीत असे वाटते की, दोन्हीकडचा पोळा फुटेल. आपापले बैल आपापल्या पद्धतीने उधळले जातील. स्थानिक पातळीवर अधिकार दिले म्हणजे वरचे नेते चिंतामुक्त होतात. विजयाचे श्रेय घेता येते आणि पराजयाची जबाबदारी सहज झटकता येते. ‘आम्ही स्थानिक पातळीवर अधिकार दिले होते, तरीही पराभवाचे चिंतन करू’ असे म्हणून मोकळे होता येते. संपूर्ण राज्यासाठी रणनीती ठरविण्याचे कष्ट घ्यावे लागत नाहीत.

२०१७ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हाही भाजप-शिवसेना युती बहुतेक ठिकाणी नव्हतीच. ‘वाघाच्या जबड्यात घालुनी हात, मोजितो दात, जात ही आमुची...’ या शब्दांत फडणवीस यांनी मित्रपक्ष शिवसेनेला जाहीर प्रचारसभेत ललकारले होते. आगामी निवडणुकीत त्यांनी शिंदेसेनेला तसेच सुनावण्याची वेळ तर येणार नाही? तुरळक ठिकाणी महायुती होईल, त्या तुलनेत महाविकास आघाडी जास्त ठिकाणी झालेली दिसू शकेल. कारण, आपापल्या माणसांना तिकीट द्यायचे तर महाभक्कम महायुतीतील पक्षांना आपापल्या माणसांना सुट्टे सुट्टे सोडावे लागेल आणि विधानसभेत गेलेली रया परत आणायची असेल तर महाविकास आघाडीला एकमेकांना सांभाळून घेण्याशिवाय पर्याय नाही. अर्थात बडबोले नेते आज आहेत आणि उद्याही राहतीलच, त्यामुळे ते सोबतच राहतील याची हमी देता येत नाही. आगामी निवडणुकांआधी मविआतील तीनपैकी एका पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ‘पवार कुटुंबातील वाद संपू दे’ असे साकडे अजित पवारांच्या मातोश्रींनी विठुरायांना घातले आहेच. मुलगा आणि दिराने त्यांना प्रतिसाद दिला तर काहीही होऊ शकते. आधी घट्ट प्रेम होते, मग ताटातूट झाली, आता पुन्हा प्रेम होईलही कदाचित. मंत्री नरहरी झिरवाळ तर मोठ्या साहेबांसमोर लोटांगण घालणार आहेत. शिवसेना एकत्र येणार नाही. कारण एकीकडे ठाकरे, तर दुसरीकडे शिंदे आहेत. इथे तर दोन्हींकडे पवारच आहेत. ठाकरे-शिंदे एकमेकांचे शत्रू वाटतात, शरद पवार-अजित पवार विरोधक वाटतात; शत्रू नाही.

महायुतीत तीन पक्ष वेगळे लढले तर मोठे आव्हान असेल ते एकनाथ शिंदेंसमोर. उद्धव ठाकरेंना त्यांनी विधानसभेत मात दिली ती भाजपच्या साथीने. आता अनेक ठिकाणी उद्धव यांचा सामना भाजपच्या साथीशिवाय करण्याची वेळ त्यांच्यावर येऊ शकते. ते मुख्यमंत्री होते तेव्हा आपल्या माणसांना मोठे आर्थिक बळ देत होते, आता मर्यादा आलेल्या आहेत. नाही म्हणायला त्यांच्याकडे महत्त्वाची खाती आहेत, पण शेवटची आणि सर्वांत महत्त्वाची सही तर मुख्यमंत्र्यांचीच असते ना! आमच्या साहेबांचा मूड अजूनही जागेवर नाही असे शिंदेंचे जवळचे लोक सांगत असतात, असे मूड जागेवर नसणे हे शिंदे आणि त्यांच्या पक्षाला परवडणारे नाही. फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपद चार-पाच दिवसांतच सहजतेने स्वीकारले अन् ते पुढे गेले. शिंदेंना स्थित्यंतर जड जाताना दिसत आहे.

महापालिकेवरील वर्चस्व मोडीत काढण्यासाठी अपवाद म्हणून मुंबईत महायुती होऊ शकते, कदाचित मनसेचे इंजिनही जोडून घेतील. शिंदे सोबत आले नाहीत तर मग इंजिन जोडले जाणे निश्चित असेल, पण शिंदे सोबत येतील. कारण ठाकरेंना अडवायचे तर भाजप आणि शिंदे दोघांनाही पर्याय नाही. मुंबईत महायुती यासाठीही होऊ शकते की मुंबईचा मेसेज देशभरात जातो. भाजप मित्रपक्षांचा आधी वापर करून घेतो आणि मग गरज नसली की बोट सोडून देतो असा मेसेज जाईल, दिल्लीला ते नको असेल. त्यामुळे मुंबईपुरते का होईना, पण सोबत राहा असे वरून सांगितले जाईल.

नवी मुंबईत खूप संघर्ष होईल. गणेश नाईक आणि शिंदेसेना यांच्यात ताणतणाव होतील. ठाण्यात शिंदेंसमोर नमते घेत भाजप जुळवून घेईल. कल्याण-डोंबिवलीत दोघांमध्ये खूप ताणले जाईल. तोवर रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले तर मग दोन्हीकडून धारदार तलवारी परजल्या आणि उपसल्याही जातील. नाशिकमध्ये भाजप मित्रांना मोजणार नाही. पुणे, पिंपरी चिंचवडबाबत देवेंद्र फडणवीस, अजित पवार बसून काय ते ठरवतील. नागपुरात भाजपला मित्रांची गरज नसेल. छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीशिवाय पर्याय नसेल. सकाळच्या सभेत एकमेकांचे हात हातात घेतील, संध्याकाळच्या दुसऱ्या शहरातील सभेत एकमेकांना हात दाखवतील. अनेक नेत्यांना डबल रोल करावा लागेल. देवेंद्र फडणवीस हे निर्भेळ यशासाठी नवीन रणनीती आखतील, किंबहुना त्यांनी त्यासाठीची तयारीही सुरू केली असेल. आता तर काय, नाव भी उनकी है, लहरे भी उनकी है और मल्ला तो वह खुद है.    yadu.joshi@lokmat.com 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक 2024