डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
जीवनात आपण अनेक लोकांना भेटतो, त्यांच्याबरोबर काम करतो; त्यांच्यातील काही आपल्या जवळचे होतात; परंतु फार थोडे लोक आपल्या मनाला मोह घालतात.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग माझ्यासाठी असेच होते... त्यांच्या नावाप्रमाणेच मनाला मोहविणारे! त्यांचे जाणे म्हणजे एक कालखंड समाप्त होणे आहे. काहींनी त्यांना ‘ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ म्हटले खरे, परंतु देश आज ज्या आर्थिक टप्प्यावर पोहोचला आहे, त्यात त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असून, भावी काळातही त्यांची आठवण कायम निघत राहील.
त्यांच्या कार्यकाळात मी राज्यसभेचा खासदार होतो आणि माझे भाग्य असे की मला त्यांच्याबरोबर काम करता आले, त्यांच्या कामाची शैली जवळून पाहता आली. ते कोणाला कधी रागे भरल्याचे, त्यांनी कुणाला कधी उपदेश केल्याचे मी पाहिले नाही; ते शांतपणे काम करत पुढे जात. १९९१ मध्ये भारत गंभीर आर्थिक संकटात सापडला असताना तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी सिंग यांना अर्थमंत्री करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी मिळून भारताची आर्थिक वाटचाल रुळावर आणली. दोघांनी अर्थव्यवस्थेची दारे जगासाठी उघडी करून दिली.
त्यानंतरचा भारताच्या प्रगतीचा हिशेब सगळ्यांच्या समोर आहे. आज भारत जगातील पाचवी आर्थिक शक्ती आहे. याची बीजे नरसिंह राव यांच्या कार्यकाळात मनमोहन सिंग यांनीच पेरली होती.
त्यांची क्षमता लक्षात घेऊनच सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपदासाठी त्यांची निवड केली आणि डॉ. सिंग यांनी ती निवड सार्थ ठरवली. मात्र, काँग्रेसमध्ये उभ्या राहिलेल्या नव्या गटानेच त्यांना जास्तीत जास्त त्रास दिला. ते सरकारी दौऱ्यावर अमेरिकेत गेले असताना राहुल गांधी यांनी त्यांच्या सरकारने काढलेला एक वटहुकूम फाडून टाकला. तेव्हा मी डॉ. सिंग यांना म्हणालो होतो, ‘मला असे वाटत होते, आपण परत आल्या आल्या थेट राष्ट्रपती भवनात जाल आणि राजीनामा द्याल!’ - डॉ. सिंग म्हणाले, ‘हा विचार दोनदा माझ्या मनात आला होता. या विषयावर मी पत्नी गुरशरणशी चर्चाही केली. मग माझ्या मनात आले, असे करणे कितपत योग्य होईल? सोनिया गांधी यांना त्रास होईल म्हणून मी थांबलो!’
- वास्तव हेच आहे की, त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेसमध्ये उभ्या राहिलेल्या नव्या गटाने त्यांना काम करणे कठीण केले होते. त्या काळात त्यांच्या मनात राजीनामा देण्याचे विचारही आले. राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचा सल्ला त्यांनी सोनिया गांधी यांना दिला होता. परंतु, राहुल गांधी तयार नव्हते. मंत्रिमंडळात सहभागी होण्याचीही त्यांची इच्छा नव्हती. काँग्रेसमध्ये त्यावेळी जे काही चालले होते ते पाहून २०१४ मध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेवर येणार नाही, याचा अंदाज डॉ. सिंग यांना आलेला होता. तरीही ते १०० जागा मिळतील, अशी अपेक्षा ठेवून होते. ‘इतक्या मिळणार नाहीत’, असे मी त्यांना म्हणालो; त्यावर ते म्हणाले, ‘तेही शक्य आहे.’ पक्षाला कायमच स्वतःपेक्षा जास्त महत्त्व देणे हे मनमोहन सिंग यांचे मोठे वैशिष्ट्य होते.
ते जितके प्रतिभावान होते तितकेच शानदार माणूस! मी त्यांच्या घरी गेलो की अगत्य इतके की, निरोप द्यायला दारापर्यंत येत असत. भारतीय संस्कृती त्यांच्या व्यक्तित्वात मुरलेली होती. भांगड्याबरोबर लोहडी सणाचा आनंद मनमुराद लुटायचे. मॉन्टेकसिंग अहलुवालियाही कुटुंबासह सामील होत असत. २००८ साली खालसा पंथाला ३०० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा नांदेड साहिब गुरुद्वारात आयोजित त्रिशताब्दी महोत्सवाला त्यांनी मला बोलावले होते. हा समारंभ शानदार व्हावा अशी त्यांची इच्छा होती. ते स्वतः तसेच योजना आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेकसिंग अहलुवालिया आणि अन्य अधिकारी शीख पंथाचे होते. मी या महोत्सवासाठी जास्त निधी दिला जावा, अशी मागणी करणारे पत्र लिहिले. कार्यक्रमासाठी सरकारने पहिल्या हप्त्यात ५०० कोटी रुपये दिले. आयोजनासाठी तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील यांना अध्यक्ष केले गेले. स्थानिक गटबाजी बाजूला ठेवण्यासाठी मुंबईचे पोलिस आयुक्त राहिलेले पी. एस. पसरीचा यांना स्थानिक समितीचे प्रमुख केले गेले. जमिनीच्या काही वादामुळे विमानतळावरील रन -वे वाढवता येत नव्हता. तत्कालीन नागरी उड्डयनमंत्री प्रफुल्ल पटेल यांना मी आग्रह केला आणि नवा रन-वे तयार केला गेला. आंतरराष्ट्रीय विमानेही त्या रन-वेवर उतरू लागली.
आणखी एक प्रसंग आठवतो. परमाणु ऊर्जा रिॲक्टर मिळवण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत होते. मनमोहन सिंग यांनी अमेरिकेतील मोठे उद्योगपती संत सिंह चटवाल यांच्याशी असलेल्या आपल्या मधुर संबंधांचा त्यासाठी उपयोग केला. चटवाल भारतप्रेमी होते आणि अमेरिकन राष्ट्रपतींशी असलेल्या त्यांच्या जवळिकीचा फायदा भारताला मिळाला.
हे मी यासाठी लिहितो आहे की, डॉ. सिंग हे किती चौफेर आणि सहयोगी व्यक्तिमत्त्व होते, याची कल्पना आपल्याला यावी. अत्यंत स्वच्छ प्रतिमा हे डॉ. सिंग यांचे आणखी एक विशेष! परंतु असाही एक काळ आला की, त्यांच्या डोक्यावर अटकेची तलवार लटकत होती. आपण संकटात आहोत, असे त्यांना वाटत होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार स्पष्ट होते. माजी पंतप्रधानांवर अशा प्रकारची कारवाई करण्याने चुकीचा पायंडा पडेल. कुणी पंतप्रधान मग निर्णयच घेणार नाहीत, हे त्यांनी जाणले. डॉ. मनमोहन सिंग यांच्यासाठी फक्त एवढेच म्हणेन,‘जमाना कर न सका उसके कद का अंदाजा, वो आसमान था, लेकिन सर झुका कर चलता था...’