जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे सावनेर येथील आमदार सुनील केदार यांच्या चौकशीसाठी सरकारला सक्षम अधिकारी नेमता येत नसेल तर केदार यांना क्लीन चिट का देऊन टाकत नाही, असा संतप्त सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी सरकारला केला. न्यायालयाच्या या सवालाने ‘पारदर्शी’ कारभाराचा ढोल बडवणाऱ्या राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. केदारांच्या बचावासाठी सरकारने दारामागे काही राजकीय अॅडजेस्टमेंट तर केली नाही ना, थातूरमातूर चौकशी आटपून सरकार केदारांना पळवाट तर शोधून देत नाही ना, असेही अनेक प्रश्न यातून उपस्थित झाले आहेत. केदार हे काँग्रेसचे आमदार आहेत. ते नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना बँकेत रोखे घोटाळा झाला. या प्रकरणी केदारांना अटकही झाली होती. ते काही महिने तुरुंगातही होते. आता या प्रकरणी चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती करण्यावरून राज्य सरकार चालढकल करीत आहेत. चौकशीसाठी सहकार अथवा जिल्हा न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करा, असा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यानुसार सरकारने ९ निवृत्त न्यायाधीशांची यादी तयार केली. त्यापैकी तीन न्यायाधीशांची संमती मिळविली. यापैकी एका निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी केली जाईल, असेही सरकारतर्फे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात गुरुवारी सुनावणीच्या वेळी चौकशी अधिकारी म्हणून एका निवृत्त न्यायाधीशांचे नाव समोर केले गेले, ते न्यायालयाला पसंत नव्हते. यामुळे सरकारच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित झाले आहेत. सरकारचे हे पाऊल ओळखून उच्च न्यायालयाला सरकारचे कान टोचावे लागले, ही सरकारवर ओढवलेली नामुष्कीच आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत केदार यांच्या विरोधात भाजपा उमेदवाराचा अर्ज रद्दबातल ठरला. रिंगणात भाजपाचा उमेदवार नसतानाही भाजपा कार्यकर्त्यांनी आपली संपूर्ण शक्ती केदारांविरोधात शिवसेनेच्या पाठीशी उभी केली होती. केदार थोडक्यात बचावले. तेव्हापासून स्थानिक भाजपा कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. सावनेर, खापा, कळमेश्वर नगर परिषदेत केदारांना मात मिळाल्यानंतर भाजपा कार्यकर्ते काहीसे सुखावले होते. स्थानिक पातळीवर एवढा विरोध असताना सरकार मात्र केदारांना का वाचवित आहे, असा प्रश्न स्थानिक भाजपा नेत्यांना पडला असून, यामुळे त्यांची व बँकेतील घोटाळ्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढली आहे.
भाष्य - सरकारची नाचक्की
By admin | Updated: May 6, 2017 00:10 IST