अन् भाषा रुळू लागली!

By admin | Published: April 23, 2017 01:57 AM2017-04-23T01:57:37+5:302017-04-23T01:57:37+5:30

महाराष्ट्र राज्याची स्थापना १९६०मध्ये झाल्यावर पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ज्या अनेक योजना सुरू केल्या, त्यात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

And the language began to grow! | अन् भाषा रुळू लागली!

अन् भाषा रुळू लागली!

Next

- अ. पां. देशपांडे

महाराष्ट्र राज्याची स्थापना १९६०मध्ये झाल्यावर पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ज्या अनेक योजना सुरू केल्या, त्यात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ , महाराष्ट्र राज्य परिभाषा संचालनालय स्थापन करून साहित्याबरोबरच विज्ञानालाही प्रोत्साहन दिले. (यातच विश्वकोश मंडळ अंतर्भूत होते, ते आजच्यासारखे तेव्हा स्वतंत्र नव्हते.)
साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे छापल्या गेलेल्या पुस्तकात श्री.वि. सोहोनी यांची रेडिओ रचना व दुरुस्ती, रेडिओ कार्य, रेकॉर्ड प्लेअर, टेलिव्हिजन अशी पुस्तके होती; तर प्रा. प.म. बर्वे यांची साखर, खनिज तेल व रसायने, वि.त्र्यं.आठवले व इतर अणुशास्त्रज्ञाचे अणुयुग अशी पुस्तके छापली. मराठी विश्वकोशात तर शेकडोंनी विज्ञानावरच्या नोंदी आहेत.
परिभाषा संचालनालयाने अनेक विज्ञान विषयांवर कोश छापले. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भाषा महाराष्ट्रात हळूहळू रुळू लागली. ती पाठ्यपुस्तकात येऊ लागली. वर्तमानपत्रात लेख प्रसिद्ध होऊ लागले. पुस्तकात येऊ लागली, आकाशवाणी-दूरदर्शनवर वापरली जाऊ लागली आणि जाहीर भाषणातून व लोकांच्या संभाषणातून वापरली जाऊ लागली.

१९७८ साली पुण्याला पु.भा. भावे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या साहित्य संमेलनात कोशकारांचा सत्कार केला गेला होता. त्यात कोशकार म्हणून लक्ष्मणशास्त्री जोशी, चित्रावशास्त्री, ग.रं. भिडे, महादेवशास्त्री जोशी अशा लोकांचा सत्कार झाला. सत्काराला उत्तर देताना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणाले, आम्हा सर्वांचा सत्कार झाला हे ठीक झाले, पण आम्हा सगळ्यांमधील ज्येष्ठ प्राचार्य गो.रा. परांजपे यांचा सत्कार झाला नाही याची मला खंत वाटते. एक तर ते आम्हा सर्वांपेक्षा वयाने ज्येष्ठ आहेत. दुसरे म्हणजे त्यांचे काम सर्वांत अवघड आहे. आम्ही धर्म, तत्त्वज्ञान यावरचे कोश करतो, पण गो.रा. परांजपे यांचे कोश विज्ञानावरचे आहेत. आमचे कोश करणे सोपे आहे, कारण ही भूमीच मुळी तत्त्वज्ञानाची आहे, त्यामुळे ती भाषा, संस्कृती आम्हाला अवगत आहे. पण, विज्ञानाचे तसे नाही. ते आमच्या भूमीत रुळलेले नाही. ते परके आहे. ती भाषा आपल्याला घडवावी लागते, अवगत करून घ्यावी लागते, प्रयत्नपूर्वक अंगी बाणवावी लागते.
विज्ञानाच्या भाषेबद्दल एक हकिकत सांगण्यासारखी आहे. १९८०च्या दरम्यान मराठी विज्ञान परिषद - ईशान्य मुंबई विभागातर्फे ट्यूब लाइट या विषयावर एक पुस्तिका काढावी असा विचार होता. त्यासाठी तंत्रज्ञानातील उपकरणांवर पुस्तके लिहिणारे श्री. वि. सोहोनी यांना विनंती करण्यात आली. त्यांनी त्या पुस्तिकेचे लिखाण केल्यावर ते त्या वेळी सोमय्या प्रकाशनाचे प्रमुख अधिकारी असलेल्या डॉ. गंगाधर कृ. कोशे यांना दाखवले. त्यांनी याचा वाचक कोण, म्हणून प्रश्न विचारला. त्या वेळी याचा वाचक सामान्य माणूस, असे सांगितल्यावर ते म्हणाले, मग ही भाषा बोजड झाली आहे, ती सोपी करायला हवी. श्री.वि. सोहोनी यांना तसे सांगितल्यावर ते म्हणाले, विज्ञानाची भाषा अशी पातळ (सोपी) करणार नाही. मग भले तुम्ही ही पुस्तिका छापली नाही तरी चालेल; आणि शेवटी ती पुस्तिका छापली गेली नाही. साहित्यात जसे एकाच अर्थाचे बरेच पर्यायी शब्द वापरले गेले नाहीत तर ते लेखकाचे भाषा-दारिद्र्य मानले जाते, तसे विज्ञानात होत नाही. बळ या शब्दाला कधी जोर, कधी शक्ती, कधी ताकद असे लिहून चालत नाही. अर्थ बदलतो. त्यामुळे विशिष्ट अर्थ व्यक्त करायला विशिष्ट शब्दच वापरायला लागतो. विज्ञान आणि तंत्रज्ञानात भाषेचा वापर करताना हे पथ्य पाळावेच लागते.
मला इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग हा विषय शिकवायला प्रा. लिमये नावाचे एक प्राध्यापक होते. ते म्हणायचे, मी एखादा नवीन शब्द वाचला, की तो लक्षात राहावा म्हणून दिवसभरात तो अनेकवेळा वापरतो. तसे सध्याच्या जमान्यात आपण एवढी नवनवीन माध्यमे वापरत असताना जर एखादा मराठी शब्द आपल्याला आवडला तर तो इ-मेल, व्हॉटसअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक अशा नाना माध्यमांवर टाकला तर तो लोकांपर्यंत पोहोचायला (सध्याचा प्रचलित इंग्रजी शब्द - तो व्हायरल व्हायला) वेळ लागणार नाही. उदा. कॉरोनॉर हा पदाधिकारी अपघाताने अथवा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीची मरणोत्तर तपासणी करून तो मृत्यूचे कारण सांगतो. त्या कॉरोनॉरला मराठीत एक चांगला शब्द आहे - अपमृत्यू निर्णेता. चला, आजपासून हा शब्द आपण सगळे जण वापरायला सुरुवात करू या.

 

Web Title: And the language began to grow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.