शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
2
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
3
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
4
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
5
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
6
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
7
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
8
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
9
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
10
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
11
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
12
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
13
"भाजपाला मदत व्हावी म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापले", ठाकरेंच्या दोन नेत्यांमध्ये वाजले!
14
'भाजपा उपऱ्यांचा पक्ष बनलाय; आता रेशिमबाग नाही तर अदानी-अंबानी भाजपा चालवणार', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका 
15
चीनमध्ये सापडला २२०० वर्षापूर्वीचा जुना नॅशनल हायवे; डोंगर फोडून बनवला होता चार पदरी रस्ता
16
नवऱ्याचे तुकडे करणारी मुस्कान झाली आई; जेलमध्ये साहिलचा जल्लोष, कैद्यांना म्हणाला, 'तुम्ही काका झालात'
17
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
18
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
19
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
20
भाजपचा दिग्गजांना दे धक्का, भाजपकडून ४० टक्के नवे चेहरे! तिकीट न मिळाल्याने अनेकांची नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या कमावत्या तरुणाईचे आणखी किती बळी? 

By shrimant mane | Updated: December 9, 2023 06:00 IST

विकासाचे नवे प्रतीक बनलेले महामार्ग आणि अपघाती मृत्यू यांचे प्रमाण अंगावर काटा आणणारे आहे. कमावत्या तरुणाईचे बळी जाणे चिंताजनक आहे.

खेडे असो की गाव, विशेषत: महामार्गावरच्या गावांवरून जाता-येता कुठल्या तरी होर्डिंगवर अपघातात बळी गेलेल्या एक-दोन तरुणांचे चेहरे आणि त्याखाली त्यांच्या आकस्मिक मृत्यूबद्दल मित्रांनी वाहिलेली श्रद्धांजली हे नेहमीचे चित्र आहे. रांगड्या पुढाऱ्याकडून एखाद्या अभिनेत्रीच्या गालाची उपमा दिली जाते असे गुळगुळीत रस्ते, सरळ रेषेत जाणारे सहापदरी, आठपदरी महामार्ग, एक्स्प्रेस वे वगैरेंच्या पायाभूत सुविधा हा तसा तरुणाईला आकर्षित करणारा विषय, तर सिमेंट काँक्रीटचे चकचकीत रस्ते हा शहर विकासाचा नवा मापदंड. त्यातून तरुणाईला व्यवसायाच्या, रोजगाराच्या संधी निर्माण होतात असे सांगितले जाते. एकीकडे हा विकास असा फुलत असताना त्याच रस्त्यांवर जाणारे अपघाती बळी हा तितकाच चिंतेचा विषय आहे. कोरोना काळात दोन वर्षे हे प्रमाण तुलनेने कमी झाले खरे. परंतु, त्यानंतरची २०२२ या संपूर्ण वर्षभराची एनसीआरबी म्हणजे नॅशनल क्राइम रेकाॅर्ड ब्यूरोची आकडेवारी काही नव्या चिंता निर्माण करणारी आहे. 

एनसीआरबीच्या ताज्या आकडेवारीचा गोषवारा असा - २०२१ च्या तुलनेत २०२२ हे वर्ष चिंतेचे ठरले. सगळे काही वाढले. भ्रष्टाचार वाढला, आत्महत्या वाढल्या, अपघाती मृत्यू वाढले. एक लाख लोकसंख्येमागे आत्महत्यांचे प्रमाण १२ वरून १२.४ झाले. २०२१ मध्ये ३ लाख ९७ हजार ५३० आकस्मिक मृत्यू होते व त्यांचे एक लाख लोकसंख्येमागील प्रमाण २९.१ होते.  २०२२ मध्ये हा आकडा ४ लाख ३० हजार ५०४ असा झाला व प्रमाण ३१.२ झाले. निसर्गाच्या तडाख्यात ८०६० बळी गेले. त्यातील ३५.८ टक्के मृत्यू वीज कोसळून झाले. आकस्मिक मृत्यूंपैकी ४६ टक्के मृत्यू वाहतुकीशी संबंधित आहेत. त्यात सर्वाधिक १२.४ टक्के म्हणजे १ लाख ७० हजार ९२४ मृत्यू ३० ते ४५ या कमावत्या वयोगटातील, तर त्या खालोखाल १२ टक्के (१ लाख ६४ हजार ३३) मृत्यू १८ ते ३० वयोगटातील आहेत. एकूण मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू अशा कमावत्या तरुणांचे होतात. विकासाचे नवे प्रतीक बनलेले महामार्ग आणि अपघाती मृत्यू यांचे एक विचित्र समीकरण आहे. राष्ट्रीय महामार्गावर दर शंभर किलोमीटरला वर्षभरात १०३ मृत्यू हे प्रमाण अंगावर काटा आणणारे आहे. शिवाय राज्य महामार्गावर दर शंभर किलोमीटरला ४५ जणांचा जीव गेला. 

याबाबत महाराष्ट्राची स्थिती अधिक चिंताजनक आहे. देशाच्या ९.१ टक्के लोकसंख्येच्या महाराष्ट्रात देशातील १५.७ टक्के मृत्यू नोंदले गेले. त्या खालोखाल १०.१ टक्के मृत्यू मध्य प्रदेशात, दहा टक्के उत्तर प्रदेशात, प्रत्येकी ६.९ टक्के तामिळनाडू व कर्नाटकात, तर ६.२ टक्के राजस्थानात व ५.२ टक्के मृत्यू गुजरातमध्ये झाले आहेत. शहरांमधील अपघाती मृत्यूंचे प्रमाण मोठे आहे. मुंबई, दिल्ली, पुणे, चेन्नई, बंगळुरू व भोपाळ ही शहरे पहिल्या सहा क्रमांकावर आहेत. महाराष्ट्रात वर्षभरात १४ वर्षांपेक्षा कमी वयाची १३५५ मुले व ९३३ मुलींचा अपघाती मृत्यू झाला. १४ ते १८ वर्षे या विद्यार्थी दशेतील १६९१ मुले व ४२८ मुली, तर साधारणपणे बारावी अथवा पदवी-पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून नोकरी, व्यवसाय व उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणारे ११ हजार २९४ तरुण व २३८८ तरुणी अपघातांत बळी गेल्या. 

मृत्यू कोणताही वाईटच, परंतु विद्यार्थी, तरुण मुले, नुकतेच स्थिरस्थावर झालेले कमावते पुरुष व स्त्रिया अशी कर्ती माणसे अपघातात जातात तेव्हा माता-पिता, भावंडे मानसिकदृष्ट्या कोसळतात. कुटुंबाचे अपरिमित नुकसान होते. कमावती तरुण माणसे अशी अचानक निघून जातात तेव्हा त्यांच्या पश्चात चिमुकली मुले व माता-पित्यांची उपासमार होते. डोंगराएवढ्या दु:खातून सावरायला, पुन्हा उभे राहायला त्यांना कित्येक वर्षे लागतात. मुला-मुलींमध्ये समाजाने, त्यांच्या माता-पित्यांनी, परिवाराने आर्थिक, भावनिक गुंतवणूक केलेली असते. त्यांच्या उज्ज्वल भविष्याची सोनेरी स्वप्ने उद्ध्वस्त झालेली असतात. 

याचा अर्थ सगळे अपघात तरुणांच्याच चुकीमुळे होतात असे नाही. एकूण अपघाती मृत्यूंमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण तब्बल ४५.५ टक्के आहे. या अपघातांमध्ये काहीवेळा दुचाकीस्वारांची, तर बऱ्याचवेळा इतर अवजड वाहने चालविणाऱ्यांची चूक असते. जीव मात्र शक्यतो छोट्या गाडीवाल्याचा जातो. त्याचप्रमाणे १४.५ टक्के मृत्यू हे पादचाऱ्यांचे आहेत. त्यांची तर शक्यतो काहीच चूक नसते. ते भरधाव वाहने चालविणाऱ्यांनी घेतलेले बळी आहेत. या तुलनेत एसयूव्ही, कारमधील प्रवाशांच्या मृत्यूचे प्रमाण पादचाऱ्यांपेक्षा कमी म्हणजे १४ टक्के आहे. अलीकडे प्रवासी वाहनांमध्ये सुरक्षेचे जे अत्याधुनिक उपाय योजण्यात आले आहेत त्यामुळे हे प्रमाण आणखी कमी झाले आहे. 

रस्ते अपघातात लहान मुले व तरुणांना गमावण्याची वेळ येऊ नये यासाठी अमेरिकेतल्या बाल्टिमोर व सेंट लुईस या शहरांनी शंभर वर्षांपूर्वी केलेले प्रयत्न आजही जगाने अमलात आणावेत असे आहेत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मोटारींचा वापर वाढला आणि पादचाऱ्यांचे जीव धोक्यात आले. १९२१ साली संपूूर्ण अमेरिकेत १३ हजार जणांचा रस्ते अपघातात जीव गेला. १९१५ च्या तुलनेत हा आकडा दुप्पट होता. बाल्टिमोर शहराने त्या वर्षी १३० मुले गमावली. चिंताग्रस्त शहरवासीयांनी या चिमुकल्यांच्या आठवणींसाठी एक स्मारक उभारले. अपघातमुक्त आठवडा साजरा होऊ लागला. पादचारी व दुचाकीस्वारांची अधिक काळजी घेतली जाऊ लागली.  शंभर वर्षांत वाहने कैक पटीने वाढली. २०२१ साली अमेरिकेत रस्ते अपघातात ४३ हजार लोकांचा जीव गेला. हा आकडा आधीच्या १६ वर्षांमधील सर्वाधिक, तर अपघाती मृत्यूचे प्रमाण एक लाख लोकसंख्येमागे १२.९ होते. भारतातील अपघाती मृत्यूचे प्रमाण अमेरिकेच्या तुलनेत अडीच पट आहे. रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका महाशक्ती आहे असे सांगताना आणि उठसूठ अमेरिकेशी तुलना करताना माणसांचे जीव वाचविण्यासाठीही अमेरिकेचा आदर्श घेणार आहोत की नाही ?

shrimant.mane@lokmat.com

टॅग्स :Accidentअपघात