शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
2
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
3
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
5
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
6
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
7
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
9
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
10
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
11
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
12
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
13
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
14
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
15
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
16
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
17
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
18
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
19
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
20
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   

पोलिस मार खाण्यासाठी आहेत का..?; स्वतःच्या वर्दीची इज्जत स्वतःच वाचवावी लागेल

By अतुल कुलकर्णी | Updated: December 4, 2023 09:16 IST

वाहतूक पोलिसांवरील हल्ल्याचे गुन्हे दाखल करून घेण्यासाठी पोलिसांनाच पोलिस ठाण्यात तासनतास ताटकळत बसावे लागत आहे.

पोलिसवाले हप्ता लेते है, असे म्हणत वाहतूक पोलिसाच्या श्रीमुखात भडकवण्याची हिंमत एका रिक्षाचालकाची झाली. मामू, साहब को हप्ता दे दिया..., असे रिक्षातून ओरडत सांगत वाहतूक पोलिसाला न जुमानता बेदरकार रिक्षा चालवण्याची हिंमत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (बीकेसी) घडली.  घाटकोपर येथे पूर्ववैमनस्यातून एका माथेफिरूने स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर व लायटर हातात घेऊन सर्व रहिवाशांना जाळून टाकण्याची धमकी दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना आरोपीने काठीने मारहाण केली. यात दहा पोलिस जखमी झाले होते. अँटॉप हिल परिसरात गर्दी करू नका, आपापल्या घरी जा!, असे सांगत रुट मार्च काढणाऱ्या पोलिसांवरच १० ते १५ जणांच्या टोळक्याने कोयत्याने जीवघेणा हल्ला केला होता. त्यात चार पोलिस कर्मचाऱ्यांसह पोलिस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाले होते.

पोलिसांना कोणी फरपटत नेतो. कोणी त्यांचा हातपाय फ्रॅक्चर करतो. एकाने तर पोलिसाच्या हाताचा कडाडून चावा देखील घेतला. काळबादेवी परिसरात वाहतूक पोलिसांनी दुचाकीस्वाराला थांबवले तर त्याने पोलिसालाच गाडीसोबत फरफटत नेले. देवनार पोलिस ठाण्याच्या हद्दीत पळून जाणाऱ्या आरोपीचा पाठलाग केला, तेव्हा आरोपीने कोयत्याने पोलिसावर हल्ला केला. २०२२ मध्ये मुंबईत वाहतूक पोलिसांवर हल्ल्याच्या १९ घटनांची नोंद विविध पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. यावर्षी १ जानेवारी ते २८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत २९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. याच वर्षात ठाणे पोलिस आयुक्तालयात  पोलिसांवरील हल्ल्याच्या किमान ३० ते ४० घटनांची नोंद आहे.

वाहतूक पोलिसांवरील हल्ल्याचे गुन्हे दाखल करून घेण्यासाठी पोलिसांनाच पोलिस ठाण्यात तासनतास ताटकळत बसावे लागत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिस सहआयुक्त प्रवीण पडवळ यांनी कायदा व सुव्यवस्थेचे पोलिस सहआयुक्तांना पत्र लिहून पोलिसांचे होणारे हाल थांबवा, अशी विनंती केली होती. कधीकाळी स्कॉटलंड यार्ड पोलिसांसोबत मुंबई पोलिसांची केलेली तुलना या अशा घटनांमुळे पार मातीमोल झाली आहे. कोणीही यावे आणि वर्दीवर हात टाकावा. इतके पोलिस गलितगात्र झाले आहेत का? तसे जर होऊ लागले तर मुंबईसारख्या महानगरात गुन्हेगारीची पाळेमुळे उखडून टाकण्याची हिंमत ठेवणारे पोलिस दल हेच का? असे विचारावे लागेल.

मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्ससारखा उच्चभ्रू वर्गाचा वावर असणारा परिसर असो किंवा कल्याण, डोंबिवलीपासून ते पार्लेपर्यंतचा भाग. सगळ्या ठिकाणी रिक्षाचालकांची मनमानी कायम आहे. बीकेसीमध्ये भंगारातल्या ऑटोरिक्षा चालवून पोलिसांवरच दमदाटी केली जात असल्याचा प्रकार भंगार गाड्या रस्त्यावर आल्यामुळे उघडकीस आला नाही, तर वाहतूक पोलिसाला रिक्षाचालकाने मारहाण केल्यामुळे उघडकीस आला. वाहतूक पोलिस हप्ते घेण्यामुळे बदनाम होतात, पण सर्वत्र हेच घडत आहे. पोलिसांना पैसे देऊन विकत घेतले की, त्यांच्याशी वाटेल तसे वागू शकतो, ही मानसिकता तयार झाली आहे. जो जेवढा मोबदला देईल त्या प्रमाणात पोलिसांना स्वतःसाठी वापरून घेण्याची सवय अनेकांना लागली आहे. 

राजकारणी आणि अधिकारी यांचे लागेबांधे टोकाला जाऊ पाहत आहेत. काही वर्षांपूर्वी आर. आर. पाटील गृहमंत्री असताना राजभवनवर विद्यार्थ्यांचा मोर्चा गेला. राजभवन हे राज्यातील सर्वोच्च सुरक्षित ठिकाण. तेथे विद्यार्थी चालून गेले तर त्यातून वाईट संदेश जाईल म्हणून पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केला. त्या घटनेनंतर पोलिसांवर टीकेची झोड उठवली गेली. काही दिवसांनंतर एका महाविद्यालयात प्राचार्याच्या तोंडाला काळे फासून विद्यार्थ्यांनी प्राचार्याची धिंड काढली. चेहऱ्याला काळे फासलेले प्राचार्य पुढे, त्यांच्या मागे घोषणा देणारे विद्यार्थी आणि सगळ्यात शेवटी शांतपणे विद्यार्थ्यांच्या मागून चालणारे पोलिस. हे दृश्य शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडवून गेले. तेव्हा पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली म्हणून पोलिसांवर प्रचंड टीका झाली. पोलिसांनी कारवाई केली तरी, आणि नाही केली तरीही त्यांना कायमच राजकारण्यांनी झोडून काढण्याचे काम केले आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचे? अशी नकारात्मक भूमिका पोलिस दलात वाढीला लागली आहे. 

कोणतेही सरकार असो, पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये जे व्यवहार चालतात ते लपून राहत नाहीत. बदल्यांसाठी लाखो रुपये मोजणारे पोलिस अधिकारी त्यांच्या कार्यकाळात दिलेल्या पैशांची व्याजासह वसुली करू लागतात. त्यासाठी ते त्यांच्याकडे न्याय मागायला येणाऱ्या प्रत्येकाला वेठीला धरतात. पावलोपावली पैसे मागण्याची पोलिसांवर सक्ती केली जाते. आम्हाला वरपर्यंत पैसे वाटायचे असतात, असे सांगणारे अनेक अधिकारी महाराष्ट्रात आहेत. कोणीही उघडपणे या गोष्टी जाहीर कार्यक्रमातून सांगत नाही एवढीच काय ती सभ्यता. पोलिसांवर हल्ले केले तर भारतीय दंड संहिता कलम ३५३ अंतर्गत गुन्हेगारांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. दोन वर्षांपर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो, असा कायदा असूनही जर पोलिसांवर हल्ले करण्याची हिंमत रिक्षावाल्यापासून गुंडांपर्यंत सगळेच करू लागले, तर ‘हीच ती वेळ, हाच तो क्षण’, असे म्हणत पोलिसांना स्वतःच्या वर्दीची इज्जत स्वतःच वाचवावी लागेल.

जे उत्तर प्रदेश, बिहारमध्ये चालते ते आपल्याकडे घडण्याची वाट पाहायची आहे का? हल्ली एक नवीनच प्रकार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. आपापल्या भागातील बड्या नेत्यांपुढे गुडघ्यापर्यंत वाकून नमस्कार करणारे अनेक पोलिस अधिकारी दिसत आहेत. वर्दी न घालता त्यांनी ज्याचे कोणाचे पाय धरायचे जरूर धरावेत. मात्र वर्दीवर असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नेत्यांचे असे लांगूनचालन करणे, त्यांचे पाय धरणे ही घटना केवळ त्यांच्यापुरती मर्यादित राहत नाही. त्यात आपण वर्दीचाही अपमान करत आहोत याची जाणीव त्या अधिकाऱ्यांना होईल तो सुदिन...

टॅग्स :Policeपोलिस