अलका कुबल, अभिनेत्री
चित्रपट-नाटकांची कामे सुरूच आहेत. मनस्वी आनंद देणारे 'शिवशाही' हे महेंद्र महाडीक यांचे महानाट्य करत आहे. महेंद्र महाडीक यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत 'जाणता राजा'साठी बरीच वर्षे काम केले असल्याने त्यांना महानाट्याचा खूप अनुभव आहे. या नाटकात मी राजमाता जिजाऊंची भूमिका साकारत आहे. शंतनू मोघे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. २० हजारांच्या संख्येने रसिक समोर असल्यावर जणू अंगात जिजाऊ संचारल्यासारखाच अनुभव येतो. लवकरच आणखी एक नवीन नाटक करणार आहे. हे नाटक आजच्या काळातील आहे. सध्या मोजक्याच परंतु महत्त्वाच्या भूमिकांवर लक्ष केंदित केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे मल्टिप्लेक्स सिनेमागृहाचे काम सुरू आहे. सिनेमागृहापासून आंबोली घाट ३० किमी, बेळगाव ३५ किमी, गोवा ५० किमी आणि कोल्हापूर १०० किमीवर असल्याने हे ठिकाण चहूबाजूंनी कनेक्टेड आहे. या सिनेमागृहात दोन स्क्रीन्स, कम्युनिटी हॉल आणि बाजूला शॉपिंग मॉल असेल. सिनेमागृहाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. आतील ऑकॉस्टीक्स बाकी आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण होतील. अद्याप सिनेमागृहाचे नाव ठरलेले नाही. ही दोन्ही सिनेमागृहे १५० आसनक्षमतेची आहेत. गावच्या ठिकाणी अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त सिनेमागृह बनवले आहे. रिक्लायनर चेअर्ससह सर्व गोष्टी मुंबई-पुण्यातील सिनेमागृहांसारख्या आहेत. तिथल्या रसिकांना सर्व उत्तम लागते याची जाणीव ठेवून सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न आहे. बऱ्याच वर्षांपासून डोळ्यांत साठवलेले स्वप्न पूर्ण होत आहे.
वैयक्तिक जीवनात फिरणे आणि वाचन सुरू आहे. नुकतीच भेट मिळालेली ज्ञानेश्वरी आणि श्रीमद्भगवतगीता वाचली. वयाच्या सोळाव्या वर्षी संत ज्ञानेश्वर माऊली इतके अद्भूत लिहू शकतात हा केवळ दैवी चमत्कार आहे. गीता वाचताना जीवनातील लहान-सहान गोष्टींची आठवण येते. तुम्ही तुमचे कर्म करत राहा, हे खूप प्रॅक्टिकल वाटते. त्या काळी लिहिलेले आजही आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहे हे जाणवले. चार्ली चॅप्लीनचे आत्मचरित्र वाचले. जगाला हसवणारा माणूस आयुष्यभर किती दुःखे भोगून उभा राहिला होता, हे जाणवले. करिअरच्या या टप्प्यावर असे काहीतरी वाचायला आवडते आहे. कथा-कादंबऱ्या वाचतेच, पण चरीत्रे लक्ष वेधतात. नुकतेच दिल्ली-चंडीगड-हिमाचल प्रदेश फिरले. जुलै-ऑगस्टमध्ये स्वित्झर्लंडचा दौरा करण्याचा मानस आहे.