अकलेचे धूमकेतू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:01 AM2018-04-25T00:01:53+5:302018-04-25T00:01:53+5:30

ज्ञानी कीर्तिवंत माणसे विद्यापीठाबाहेर घालवून त्यांच्या कुलगुरुपदावर संघातल्या बौद्धिकांवर ज्याची बुद्धिमत्ता आणि मानसिकता तयार झाली आहे, अशी सामान्य कुवतीची माणसं आणून बसविली.

Akelle's Comet | अकलेचे धूमकेतू

अकलेचे धूमकेतू

Next

स्मृती इराणी या बार्इंनी त्यांच्या मानव संसाधन मंत्रिपदाच्या कार्यकाळात देशातील उच्च शिक्षणाचे जेवढे वाटोळे करता येईल, तेवढे आपल्या साऱ्या शक्तीनिशी केले. ज्ञानी कीर्तिवंत माणसे विद्यापीठाबाहेर घालवून त्यांच्या कुलगुरुपदावर संघातल्या बौद्धिकांवर ज्याची बुद्धिमत्ता आणि मानसिकता तयार झाली आहे, अशी सामान्य कुवतीची माणसं आणून बसविली. अमर्त्य सेन आणि काकोडकरांऐवजी अत्यंत कमी कुवतीच्या माणसांचा आधार घेऊन आधीच कोलमडत आलेल्या शिक्षणाची अवस्था आणखी हास्यास्पद केली. त्यांच्या जागी आलेल्या प्रकाश जावडेकरांनाही अजून तो डोलारा सावरता आला नाही. त्यातच मोदींच्या मंत्रिमंडळातील काही माणसे त्यांच्या अकलेचे जे धूमकेतू आकाशात सोडत आहेत, ते पाहिले की उच्च शिक्षणाएवढीच आजच्या नव्या पिढ्यांना जगाशी कराव्या लागणाºया स्पर्धेचीही चिंता वाटू लागते. राजपाल सिंग नावाचे एक राज्यमंत्री सध्या गृहखात्यात आहे. एका विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात भाषण करताना त्या ज्ञानी पुरुषाने डार्विनचा जगन्मान्य सिध्दांत चुकीचा असल्याचे सांगणारा त्याच्या अकलेचा धूमकेतू आकाशात सोडला आणि स्वत:एवढेच आपल्या सरकारचेही देशात व जगात हसे करून घेतले. त्याचे अज्ञान त्यास जाणवून दिल्यानंतरही आपण म्हणतो त्यावर जगात चर्चा व्हावी असा मूर्ख आग्रह तो काही काळ करताना दिसला. पुढे बहुदा मोदींनीच त्याला समज दिल्यानंतर त्याने आपले शहाणपण पाजळणे थांबविले असावे. आता असा धूमकेतू त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदावर परवा आलेल्या विप्लवकुमार देब या मुख्यमंत्र्याने आकाशात सोडला आहे. रामायण आणि महाभारताच्या काळात भारतात इंटरनेट व कॉम्प्युटर अशा आधुनिक व्यवस्था अस्तित्वातच होत्या आणि माणसे त्यांचा वापरही करीत होती, असे या अर्र्धज्ञानी मुख्यमंत्र्याने जाहीर केले आहे. महाभारत हा ग्रंथ इ.स.पूर्व २३०० ते इ.स.पूर्व १५० वर्षे एवढ्या काळात विकसित झाला आहे. आज उपलब्ध असलेल्या रामायणाची रचनाही दीर्घकाळ झाली आहे. या विप्लवकुमार देब यांनी यातल्या कोणत्या काळात इंटरनेट व कॉम्प्युटर होते, हे सांगितले असते तर त्याचा देशाच्या ज्ञानवृत्तीला काही उपयोग तरी झाला असता. परंतु असे धूमकेतू नुसतेच उडवायचे आणि त्यांच्या उडत्या शेपट्या लोकांना पाहायला लावायच्या आणि तसे करताना आपले व देशाचे जगात हसे करू घ्यायचे. एवढेच शहाणपण ठाऊक असलेल्यांकडून तेवढ्या विवेकाची अपेक्षा नाही. काही काळापूर्वी जागतिक पातळीवरच्या विज्ञान परिषदांमध्ये रामायणातील पुष्पक विमान खरोखरीच कसे होते आणि महाभारतातील युद्धामध्ये अणवस्त्रे कशी वापरली गेली, यावरचे प्रबंध वाचून आपल्या देशी विद्वानांनी साºया देशाचीच जगात खिल्ली उडवून घेतली होती. महाकवींच्या प्रतिभांनी पसरविलेल्या कल्पनांना वैज्ञानिक सत्य मानण्याचा मूर्खपणा अजून आपल्या ज्ञान-विज्ञानाच्या देशात शाबूत ठेवण्याचे सध्याचे असे प्रयत्न पाहिले की घटनेने नागरिकांना वैज्ञानिक दृष्टी प्राप्त करण्याचा जो निर्देश दिला त्याचे काय, असा प्रश्न आपल्याला पडावा. पं. नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधींच्या काळात देशाने वैज्ञानिक दिशा धारण केलेली व तिने अंधश्रद्धांवर मात केलेलीही जगाने पाहिली होती. आताचे मंत्री डार्विनला खोटा ठरवित असतील आणि रामायण-महाभारतात इंटरनेट अस्तित्वात होते, असे म्हणत असतील तर भारताने गेल्या पाच हजार वर्षांत प्रगती साधली की त्याने अधोगतीचा मार्ग पत्करला, असाच प्रश्न आपल्याला पडावा. असे बोलू शकण्याचे बौद्धिक धाडस जे करतात त्यांना ज्ञानी म्हणत नाहीत. साध्या भाषेत त्यांना अडाणी म्हणतात. अशी अडाणी माणसे केंद्रीय मंत्रिमंडळात वा राज्यांच्या मुख्यमंत्रिपदावर नेमणाºया पक्षांना व त्यांच्या पुढाºयांना मग काय म्हणायचे असते? या माणसांच्या हाती देशाची व राज्यांची सूत्रे राहत असतील आणि तरीही देश व राज्ये काम करीत असतील तर मग त्यांना व आपल्याला खरोखरीच देव तारत असला पाहिजे, असेच म्हणावे लागते.

Web Title: Akelle's Comet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.