अजातशत्रू अन् निष्ठावान नेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 01:42 AM2018-06-03T01:42:58+5:302018-06-03T01:42:58+5:30

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या या भावना...

Ajatshatru and loyal leader | अजातशत्रू अन् निष्ठावान नेता

अजातशत्रू अन् निष्ठावान नेता

googlenewsNext

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या या भावना...

भाऊसाहेब फुंडकर यांचे निधन झाल्याचे कळले आणि मला धक्काच बसला. अनेक आठवणींचा पट उलगडला गेला. भावना दाटून आल्या. दिवंगत प्रमोदजी महाजन, गोपीनाथजी मुंडे आणि भाऊसाहेबांनी मला आणि भाजपामधील माझ्यासारख्या नंतरच्या पिढीतील अनेक जणांना वेळोवेळी केलेले मार्गदर्शन आणि दिलेले प्रोत्साहन यातून आम्ही घडत गेलो. भाऊसाहेब स्वत: एक हाडाचे कार्यकर्ते होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून ते तयार झाले आणि नंतर त्यांनी जनसंघ व भाजपाच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले. ४०-४५ वर्षे संघटना व पक्षनिष्ठेची वाट ते अविरत चालत राहिले. त्यातील अनेक वर्षांचा मार्ग हा कंटकीच होता; पण एका ध्येयाने प्रेरित भाऊसाहेबांसारखे कार्यकर्ते इतके भारावून गेलेले होते की त्यांना त्या काटेरी मार्गाची तमा नव्हती. मी अनेक वर्षे भाऊसाहेबांना जवळून पाहत आलो. जनसंघ, भाजपावरील त्यांचे निस्सीम प्रेम तर वादातीत होतेच पण रा.स्व. संघ हा त्यांच्यासाठी जीव की प्राण होता. मी अनेकदा बघितले की कोणत्याही बाबतीत संघाचा शब्द त्यांच्यासाठी अंतिम असे आणि त्या पलीकडे ते कधीही विचार करीत नसत. पक्षाने आपल्याला काय दिले यापेक्षा आपण पक्षाला काय दिले याचाच विचार त्यांच्या ठायी असे. दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे एवढेच त्यांना माहिती होते. पदांचा मोह त्यांनी कधीही बाळगला नाही. एखादी जबाबदारी मिळाली नाही म्हणून त्यांनी कधी आक्रस्ताळेपणादेखील केला नाही. मनाच्या विरुद्ध निर्णय झाला तरीही ते पक्षासोबतच राहायचे. पक्षाशी प्रतारणा करण्याचा विचार त्यांना कधी शिवलादेखील नाही.
गोपीनाथराव आणि भाऊसाहेबांचा एकमेकांशी प्रचंड स्नेह होता. दोघांनी खांद्याला खांदा लाऊन भाजपाला प्रचंड उभारी दिली. तळागाळातील कार्यकर्ते जोडण्याचे मोलाचे कार्य केले. ‘शत प्रतिशत भाजपा’ हा नारा भाऊसाहेब भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी दिला. तेव्हा ते अशक्यप्राय वाटत होते. युतीमध्ये भाजपाची भूमिका लहान भावाची होती आणि शिवसेनेपेक्षा आपण पुढे कसे जाऊ शकतो व ‘शत प्रतिशत’ कसे काय होऊ शकतो अशी शंकाही होती; पण, भाऊसाहेबांच्या त्या घोषणेने नवा विश्वास दिला. पक्ष मोठा करण्यासाठीचा त्यांचा संघर्ष अनेकांसाठी प्रेरणादायी होता.
आमगाव ते खामगाव ही शेतकरी दिंडी त्यांनी काढली होती. महादेवराव शिवणकर, अरुणभाऊ अडसड हेही होते. त्या दिंडीने भाऊसाहेबांना राज्यव्यापी नेतृत्व मिळवून दिले. ते हाडाचे शेतकरी होते. कापूस पणन महासंघाचे ते अध्यक्ष होते तेव्हा कापूस एकाधिकार योजना त्यांनी चांगल्या पद्धतीने राबविली. त्यातील भ्रष्टाचार बराच कमी करून पारदर्शकता आणली होती. ते अजातशत्रू होते. ज्या काळात राज्य सहकारी बँकेवर भाजपाचे कोणी निवडून येऊ शकत नव्हते तेव्हा ते बँकेचे संचालक म्हणून बिनविरोध निवडून यायचे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणूनदेखील त्यांनी अतिशय चांगली भूमिका वठविली. ते सरकारवर जोरदार हल्ले चढवायचे पण त्याचवेळी त्यांनी कुणाशी कटुता येऊ दिली नाही. त्यामुळे सर्व पक्षांमध्ये त्यांना मोठा मानसन्मान होता.
ते वारकरी होते. आषाढीला दरवर्षी नित्यनेमाने ते पंढरपूरला जात. पंढरीच्या वाटेने जाणाऱ्या हजारो-लाखो कष्टकºयांच्या भावभावना आणि त्यांचे दु:ख जाणणारा व ते दूर करण्यासाठी मी काय करू शकतो याचा सातत्याने विचार करणारा हा नेता होता. कृषी व सहकार क्षेत्राचे त्यांना सखोल ज्ञान होते. कृषिमंत्री म्हणून ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ अशी अतिशय चांगली योजना त्यांनी तयार केली. शेतीतील यांत्रिकीकरणावर भर दिला. मोठ्या प्रमाणात कृषी प्रदर्शनांचे आयोजन करून शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकºयांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा आग्रह होता. कृषी क्षेत्रातील अडचणींवर मात करून प्रगतीकडे नेण्यासाठी कृषिमंत्री म्हणून ते अविरत कार्यरत होते.
एक सामान्य कार्यकर्ता, आमदार, खासदार, विरोधी पक्षनेते, मंत्री अशा विविध भूमिकांमध्ये भाऊसाहेब वावरले; पण त्यांच्या वागण्याबोलण्यातील वºहाडी बाज आणि साधेपणा तीळमात्रही कमी झाला नाही. अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी घडविले; मोठे केले; पण ते करत असताना त्याचे श्रेय त्यांनी स्वत:कडे घेण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. भाजपाला बहुजन चेहरा देण्यात भाऊसाहेबांचा मोठा वाटा होता. त्यांच्यासारखे नेते ध्येयपथावर निरंतर चालत राहिले म्हणूनच पक्षाला आज विशाल रूप मिळाले. त्यांच्या अकाली निधनाने राज्य भाजपाला एक पोरकेपणच आले आहे. सामान्यांशी नाळ जुळलेला निष्ठावंत नेता म्हणून भाऊसाहेबांची उणीव कायम भासत राहील.

(शब्दांकन : यदु जोशी)

Web Title: Ajatshatru and loyal leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.