शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

स्कोअर काय झाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 10:17 IST

आजपासून दीड महिना भारतातच नाही, तर संपूर्ण भारतीय उपखंडात क्रिकेट हा जगण्या-मरण्याचा विषय ठरेल.

आजपासून दीड महिना भारतातच नाही, तर संपूर्ण भारतीय उपखंडात क्रिकेट हा जगण्या-मरण्याचा विषय ठरेल. 'स्कोअर काय झाला?, या प्रश्नानं लोकांच्या भुवया उंचावतील, ते हसतील, चिडतील, कचाकचा भांडतील, सोशल मीडियात कमेण्ट, मीम्सचा पाऊस पडेल, आशा-निराशेचा खेळ श्वास कंठाशी आणेल तरीही त्यापलीकडे असेल रसरसून जगण्याचा एक आनंद! रोजच्या जगण्यातल्या विवंचनांनी छळलेल्या आणि जगण्याचे कुठलेच आनंद निरलस, सहज आणि नितळ उरलेले नसताना 'क्रिकेट' नावाचा एक जादूगर खेळ सगळ्या ताणतणावांच्या जखमांवर औषध म्हणून फुंकर मारेल. ते पुरेसं नसेलही; पण काही क्षण तरी 'बरं वाटल्याचा' आनंद मिळेल. त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे जात-पात, पंथ, धर्म, राजकीय विचारधारांनी पोखरून पुरते विकल आणि विफल केलेल्या दुफळी माजलेल्या समाजात किमान दीड महिना तरी एकच ओळख घेऊन बहुतांश माणसं जगतील. 'भारतीय ही ओळख सगळ्यांना एका सूत्रात बांधण्याची जादू पुन्हा एकदा क्रिकेट करूनही दाखवेल. 

अर्थात हारजीतीचे प्रश्न असतील. गेल्या १० वर्षात भारतीय संघाने एकही आयसीसी किताब जिंकलेला नाही. आयपीएलमध्ये उदंड पैसा कमावणाऱ्या भारतीय संघात आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या पोटातही जिंकण्याची आग उरलेली नाही, असे आरोप तर सर्रास होतात. त्याचे कारण म्हणजे मागचा विश्वचषक भारतीय संघाने जिंकला त्याला आता तप उलटून गेलेलं आहे. त्या संघात खेळलेले फक्त दोन खेळाडू यावेळच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळत आहेत. संघनिवड आणि संघभावनेसह कप्तानाचे उत्तम नेतृत्व याविषयीही शंका, संशयाचे मळभ विश्वचषक स्पर्धा सुरू होतानाही हटलेले नाही. या स्पर्धेत तरी भारतीय संघाने 'करू या मरू' सामन्यात हाराकिरी न करता आपल्या क्षमतेला न्याय देत खेळावं आणि घरच्या मैदानावर पुन्हा एकदा विश्वचषक जिंकावा, अशी अपेक्षा आहेच. परंपरेनुसार (गेल्या टी ट्रेण्टी विश्वचषकात ती परंपराही मोडलीच म्हणा) केवळ पाकिस्तान संघाला विश्वचषकात हरवणे आणि त्या आनंदाचं विद्रूप प्रदर्शन करणं, सामन्यांना वैर आणि युद्धाचं रूप देणं हे सारं या स्पर्धेत तरी मागे पडावं, अशी अपेक्षा आहे. अर्थात तसं होणार नाही. आक्रमक मार्केटिंगच्या या काळात नकारात्मकता जास्त विकली जात असताना सकारात्मकतेचे दिवे मिणमिणतच उजळणार हे वास्तव आहे; पण ते दिवे किमान तेवते राहतील आणि सभ्य माणसांचा खेळ म्हणून क्रिकेट आपली पत राखेल, असं वाटावं इतपत कस अजूनही क्रिकेटने टिकवून ठेवला आहे.

एकीकडे क्रिकेटची बाजारपेठ मोठी होते आहे, प्रक्षेपणाचे हक्क आणि स्पॉन्सर्स यांच्याभोवती फिरणारा पैसा काही कोटी रुपयांच्या अव्याढव्य उलाढाली होत फिरतो. क्रिकेट हा फक्त खेळ नाही तर त्यानं मनोरंजनाची जागाही कधीच घेतली. धनसत्तेपुढे सर्वत्रच लोटांगणं घातली जात असताना क्रिकेटही त्यापासून दूर नाही; पण अजूनही एकदा सामना सुरू झाला की क्रिकेट पुन्हा पुन्हा आपल्या ग्लोरियस अनसर्टन्टी'ची झलक दाखवते. मैदानात पडलेला प्रत्येक चेंडू आपली कहाणी घेऊन येतो. तिथे भाइभतिजा राजकारण चालत नाही, अमक्यातमक्याचा मुलगा म्हणून भारतीय संघात वट कमावता येत नाही. क्रिकेटभोवती भारतीय उपखंडातलं राजकारण फिरू शकतं, आशिया चषकाच्यावेळी ते जाहीर दिसलंही. खेळाच्या मैदानावर एकच गोष्ट खरी ठरते ती म्हणजे गुणवत्ता आणि मेहनत. क्रिकेटने खऱ्या अर्थाने देशातल्या लोकशाहीकरणाला वेग दिला. एकेकाळी क्रिकेट हा राजारजवाड्यांचा खेळ होता, नंतर तो केवळ मोठ्या शहरात रुजला, वाढला. मात्र, जागतिकीकरणाची दारं देशानं उघडली, दूरचित्रवाणी देशभर पोहोचली, तसतसे क्रिकेट छोट्या शहरात पाझरू लागले आणि मूळही धरू लागले. रांचीचा धोनी भारतीय संघाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार झाला आणि आजच्या संघात देशाच्या लहान शहरातले खेळाडू दिसतात. त्यांनी क्रिकेटला बेधडक आणि बिनधास्त रंगरूप दिले. आपली गुणवत्ता हीच आपली ताकद आणि तीच आपली ओळख हे त्यांनी सिद्ध केलं आहे. गुणवत्ता असली तर आपण मोठी स्वप्नं पाहू शकतो आणि मेहनतीची तयारी असेल तर ती साकारूही शकतो, यावर विश्वास ठेवण्याची ताकद आजच्या भारतीय तारुण्याला देण्याचं काम क्रिकेट करतं आहे. पुढचा दीड महिना क्रिकेटचा हा जलसा चांगुलपणावरचा विश्वास वाढवेल, अशी आशा आहेच. सोबतच भारतीय संघाने नव्हे, 'भारताने ' चषक जिंकावा, ही सव्वाशे कोटी भारतीयांची इच्छाही फलद्रूप होवो!