शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
3
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
4
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
5
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
6
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
7
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
8
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
9
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
10
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
11
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
12
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
13
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
14
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
15
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
16
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
17
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
18
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
19
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
20
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका

विनोद रॉयची पश्चातबुद्धी

By admin | Updated: September 15, 2014 04:47 IST

विनोद रॉय यांनी दूरचित्रवाहिनीला दिलेल्या एका प्रदीर्घ मुलाखतीत टू जी घोटाळा आणि कोळसा प्रकरणात झालेला घोळ या दोहोंचाही ठपका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर ठेवला

भारताचे माजी महाअंकपरीक्षक (कॅग) विनोद रॉय यांनी दूरचित्रवाहिनीला दिलेल्या एका प्रदीर्घ मुलाखतीत टू जी घोटाळा आणि कोळसा प्रकरणात झालेला घोळ या दोहोंचाही ठपका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर ठेवला आहे. याअगोदर त्यांनी लिहिलेल्या आपल्या पुस्तकातही डॉ. सिंग यांना त्यांनी आपला निशाणा बनवले आहे. या आरोपाला उत्तर देण्यास डॉ. मनमोहनसिंग हे स्वत: समर्थ आहेत. त्यांच्या कट्टर विरोधकांपैकी एकानेही त्यांच्यावर असा ठपका ठेवला नाही. त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना आजवर दोष दिला गेला असला, तरी तो त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे धाडस कुणी केले नाही. विनोद रॉय यांचा डॉ. सिंग यांच्यावरचा आकस याआधी अनेकदा प्रगट झाला आहे. देशाच्या महाअंकपरीक्षकाचे पद हे सर्वोच्च न्यायालयासारखेच स्वतंत्र व सरकारच्या नियंत्रणांपासून मुक्त असते. या परीक्षकाने सरकारच्या हिशेबांची केलेली तपासणी संसदेच्या लोकलेखा समितीला सादर करणे एवढीच त्याची जबाबदारी आहे. त्यामुळे डॉ. मनमोहनसिंग हे पंतप्रधानपदावर असतानाही विनोद रॉय यांना ते करता येणे शक्य होते. संसदेच्या लोकलेखा समितीचे अध्यक्षपद नेहमी विरोधी पक्षाकडे असते. त्या पक्षाने तशा अहवालाचे आनंदाने स्वागतही केले असते. मात्र, पदावर असताना ती जबाबदारी पार न पाडता निवृत्तीनंतर विनोद रॉय यांना सार्वजनिक स्वच्छतेचा उमाळा येत असेल, तर त्याकडे संशयाने पाहिले पाहिजे. डॉ. मनमोहनसिंग हे गेल्या ५० वर्षांपासून देशाच्या प्रशासनात व राजकारणात आहेत. एक अत्यंत सचोटीचे प्रशासनाधिकारी, मंत्री व पंतप्रधान अशी त्यांची आजवरची ख्याती आहे. याउलट विनोद रॉय हे महाअंकपरीक्षकाच्या जागेवर येईपर्यंत त्यांच्या नावाची या देशाला साधी खबरबातही कधी नव्हती. आपल्याला पदामुळे मिळालेल्या प्रसिद्धीचा आपल्या सोयीनुसार व लहरीनुसार वापर करण्याची बुद्धी झालेले अनेक लोक याआधी देशाने पाहिले आहेत. पदे गेली, राजकारण हातचे सुटले आणि जुनी सरकारे जाऊन नवी सरकारे पदावर आली, की अशा माणसांना जास्तीचा कंठ व जास्तीचे ज्ञान स्फुरत असते. माजी परराष्ट्रमंत्री के. नटवरसिंग यांना अशाच उत्साहाने ग्रासले आहे. ह्यवन लाईफ इज नॉट इनफह्ण या आपल्या आत्मचरित्रात त्यांनी सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर मनसोक्त दुगाण्या झाडल्या आहेत. नटवरसिंगांचे मंत्रिपद शाबूत होते तोवर त्यांना या दोघांतही कोणता दोष दिसला नाही. ह्यआॅईल फॉर फूडह्ण या घोटाळ््यात नाव अडकल्यामुळे त्यांचे मंत्रिपद गेले तेव्हापासून ते त्या दोघांवर राग धरून आहेत आणि तो त्यांनी आपल्या आत्मचरित्रातून उघडही केला आहे. हे करीत असतानाच त्यांनी आणखीही एका सोयीस्कर गोष्टीची व्यवस्था केली आहे. आपल्या मुलासाठी भारतीय जनता पक्षाचे विधानसभेचे तिकीट मिळविले आहे. राजकीय सोय करून झाल्यानंतर किंवा तशा सोयीवर लक्ष ठेवून नटवरसिंगांसारखी माणसे जेव्हा वागतात तेव्हा संशयाची सुई त्यांच्यावरच रोखली जाणे साहजिक बनते. विनोद रॉय यांचा आताचा उद्रेकही असाच आहे. मनमोहनसिंगांचे सरकार गेली दोन वर्षे सर्वतऱ्हेच्या टीकेला तोंड देत आले आहे. जोवर ते मजबूत व स्थिर होते तोवर विनोद रॉय गप्प होते. ते सरकार अस्थिर व दुबळे झाल्याचे दिसले तेव्हा त्यांना वाचा फुटली. महाभियोगाचा आधार घेतल्याखेरीज आपल्याला आपल्या पदावरून काढून टाकता येत नाही, याची खात्री असल्यानेच त्यांना सरकारवर राजकीय स्वरूपाची टीका करण्याचे धाडस झाले. त्यातून मिळणारी प्रसिद्धी त्यांच्याविषयीची आस्था विरोधी पक्षात निर्माण करायला कारणही झाली. विनोद रॉय यांचे प्रत्येक वक्तव्य मनमोहनसिंगांच्या विरोधकांनी ज्या तऱ्हेने उचलून धरण्याचे प्रयत्न आता चालविले आहेत ते याच तऱ्हेचे आहेत. टू जी घोटाळा आणि कोळशाचा घोळ याविषयीचे निर्णय संबंधित मंत्रालये घेत असताना मनमोहनसिंगांनी पंतप्रधान या नात्याने त्यांना अडवायला हवे होते, असा कमालीचा साळसूद वाटणारा पण प्रत्यक्षात अतिशय विषारी, असा आरोप विनोद रॉय यांनी केला आहे. पदावर असताना गप्प राहिलेली माणसे पद गेल्यानंतर जेव्हा असे बोलू वा लिहू लागतात तेव्हा त्यांचे हेतू तपासून पाहणे अधिक महत्त्वाचे ठरते. त्यातून देशाचे सरकार बदलले असेल आणि त्यात अशा माणसांना अनुकूल असणारे लोक सत्तेवर आले असतील, तर मग अशी तपासणी जरा जास्तीच्या काटेकोरपणे करावी लागते.