५७ व्या वर्षीही मी खूप हॉट दिसतो, याचं रहस्य साधं आहे! - मिलिंद सोमण

By संदीप आडनाईक | Published: December 26, 2022 08:54 AM2022-12-26T08:54:59+5:302022-12-26T08:55:38+5:30

शारीरिक कष्ट नाहीत. गाड्या, कपडे, खाण्या-पिण्याची चैन; यामुळे ऐदी होऊ नका! बदला! आपल्या शक्तीचा, शरीराचा वापर करा, नाही तर एक दिवस ते नष्ट होईल!

actor milind soman told about his opinion and fitness secret | ५७ व्या वर्षीही मी खूप हॉट दिसतो, याचं रहस्य साधं आहे! - मिलिंद सोमण

५७ व्या वर्षीही मी खूप हॉट दिसतो, याचं रहस्य साधं आहे! - मिलिंद सोमण

Next

- मिलिंद सोमण, ख्यातनाम अभिनेता, मॉडेल

(शब्दांकन : संदीप आडनाईक उपमुख्य उपसंपादक, कोल्हापूर)

मी सध्या सायकल चालवत मुंबई ते मंगळूर अशी ग्रीन राइड करतो आहे. ८ दिवसांत १० शहरांमधून १४०० किलोमीटर अंतर पूर्ण करेन. मुंबई, पुणे, कऱ्हाड, कोल्हापूर, बेळगाव, शेगाव, हिरेबेन्नूर, तुमकुरू, म्हैसूर, मंगळूर ही शहरं माझ्या वाटेत आहेत. आत्तापर्यंत मी १००० किलोमीटरची ग्रीन राइड पूर्ण केली आहे, मनात आणलं तर कुणालाही हे सहज जमेल. त्यासाठी शरीर-मनाची तंदुरुस्ती मात्र महत्त्वाची!

मला लहानपणापासून व्यायामाची आवड.  तेराव्या वर्षी मी २१ किलोमीटर अर्धमॅरेथॉन पूर्ण केली. माझी आई वयाच्या ८३ व्या वर्षीदेखील खूपच फिट आहे. ती प्राध्यापक होती. आजही काठी न वापरता ट्रेकिंग करते. हिमालयात गेली. नागालँडमध्ये आत्ताच जाऊन आली. यापूर्वी तीही सायकलिंग करत असे. व्यायामासाठी वय महत्त्वाचे नाही.

या वयातही माझा फिटनेस इतका उत्तम कसा, याबाबत अनेकजण मला विचारतात. माझ्या फिटनेसचं रहस्य काय? - तर माझं असं कोणतंही रुटीन नाही, विशिष्ट प्रकारचं डाएट नाही, मी कोणतीही सप्लिमेंट‌्स घेत नाही. मी इतरांपेक्षा वेगळं काही खात नाही. वेळ मिळेल तसा व्यायाम मात्र करतो. खरं तर दोन-दोन तास जिममध्ये जाऊन व्यायाम करण्याची, खूप घाम गाळण्याचीही गरज नाही. आपल्याला शक्य आहे, तितका वेळ व्यायाम करा. सूर्यनमस्कार घाला, उठाबशा काढा, जागच्या जागी उड्या मारा; पण हे सगळं रोज करा. आपल्यातला कमकुवतपणा शोधा. प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी मॅरेथॉनमध्ये भाग घेतला पाहिजे, वर्षातून एकदा तरी सायकलिंग केलं पाहिजे. आपल्यातला आळशीपणा मारा आणि प्रदूषण करू नका, हा माझ्या या ग्रीन राइडचा हेतू आहे.
 
सध्या लोक आळशी झाले आहेत. शारीरिक कष्ट नाहीत. मोबाइल, गाड्या, कपडे, खाद्यपदार्थ याची चैन सुरू आहे. यामुळे आपण ऐदी झालो आहोत. ते बदला, त्याचे दुष्परिणाम पर्यावरणावरही होत आहेत. आपल्या शक्तीचा, शरीराचा वापर करा, नाही तर एक दिवस ते नष्ट होईल.  स्वत:च्या मनाला, शरीराला आव्हानं देण्याची मला आवड आहे. त्याचा फायदा होतो.

माझ्या सेक्स अपीलबद्दल अजूनही चर्चा होते. लोक त्याबद्दल बोलत असतात. आज माझं वय ५७ आहे, तरीही मी खूपच हॉट दिसतो, असं लोक म्हणतात! - ते खरंही आहे म्हणा! पण  मी लोकांचं म्हणणं फार मनावर घेत नाही. त्याकडे दुर्लक्ष करतो. माझ्या सेक्स लाइफमध्ये लोकांना फार भोचक रस असतो, हेही मला माहिती आहे. असो बापडा!  मी अंकिताशी लग्न केलं तेव्हा ५३ वर्षांचा होतो आणि अंकिता माझ्यापेक्षा २६ वर्षांनी लहान! पण  मी तिच्याच  वयाचा वाटतो; कारण आमच्या नात्याचा ताजेपणा! आपली नाती जर अशी मोकळी ढाकळी आणि आनंदी असतील तर त्याचा शरीराच्या आणि मनाच्याही स्वास्थ्यावर उत्तम परिणाम होतो. 

मी कायदा पाळणारा माणूस आहे. मी कायद्याच्या बाहेर वागत-बोलत नाही. सोशल मीडियावर जे काही लिहितो, ते जबाबदारीने, भान ठेवून. त्यामुळे दीपिकाच्या बिकिनीबद्दलचं माझं मत असो, नाहीतर रणवीर सिंगबद्दल असो; मी जे लिहितो; ती माझी मतं आहेत... आणि मी व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करतो. तो सर्वांनीच करायला हवा! - बाकी माझ्याबद्दल लोक काय बोलतात, त्याकडे मी तरी दुर्लक्षच करतो!

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: actor milind soman told about his opinion and fitness secret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.