मितेश घट्टेपोलिस उपायुक्त, मुंबई
आजची सकाळ नेहमीसारखीच उगवली होती. वरळी सी फेसवर चालताना समुद्राच्या लाटा, वाहणारा वारा आणि आजूबाजूची गर्दी, सगळं काही नेहमीसारखंच. पण अचानक समोरून उपमुख्यमंत्री अजितदादांचा कॅन्व्हाय वेगाने जाताना दिसला. गाडीत बसलेल्या अजितदादांचे अगदी पुसटसे दर्शन झाले, पण त्या क्षणी हे कळलं नाही की ते शेवटचं दर्शन ठरेल. आज त्या आठवणीकडे पाहताना मन कुठेतरी आतून ओढलं जातंय...
दादांशी माझा पहिला प्रत्यक्ष संपर्क कराड येथे डीवायएसी असताना आला. मी कराडला २०१२ साली पोलीस उपअधीक्षक म्हणून रुजू झालो. याच वेळी महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष सुरू झाले होते. त्यामुळे कराड येथे वर्षभर विविध शासकीय कार्यक्रमांची रेलचेल होती. त्या निमित्ताने उपमुख्यमंत्री म्हणून कराडला येणाऱ्या अजितदादांशी संवाद वाढत गेला. भेटीगाठींमधून ओळखच नाही तर त्यांचा स्वभाव, कामाविषयीची तळमळ आणि बारकाईची नजर हळूहळू उमगत गेली.
पुणे येथे २०१९ नंतरच्या तीन वर्षात विशेष शाखेचा पोलीस उपायुक्त म्हणून काम करत असताना कोरोनाचे अभूतपूर्व संकट उभे ठाकले होते. या अवचित संकटाने प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आरोग्य व्यवस्था सगळेच तणावाखाली होते. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री या नात्याने अजितदादा न चुकता दर आठवड्याला नियमितपणे आढावा बैठक घेत असत. त्या बैठका केवळ औपचारिक नव्हत्या. बैठकीत उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सुचविलेल्या अगदी छोट्या सूचनाही ते अत्यंत गांभीर्याने ऐकत, त्यावर चर्चा करत आणि अंमलबजावणीसाठी ठाम आग्रह धरत. त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे जबाबदारीची जाणीव आणि लोकांच्या जीविताची काळजी स्पष्ट दिसायची. या काळात पोलीस दलाकडून होणाऱ्या समन्वयात माझी एक छोटीशी जबाबदारी होती. त्यामुळे पोलीस आयुक्तांसोबत प्रत्येक बैठकीला उपस्थित राहण्याचा योग आला. त्या काळात पोलिसांनी राबवलेल्या प्लाझ्मा दान या उपक्रमाचा समन्वयक म्हणून दादांनी माझे आवर्जून कौतुक केले. त्या शब्दांनी कामाचा उत्साह कितीतरी पटींनी वाढला होता.
धडाडीचे प्रशासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादांसोबत अनेक प्रसंगांत चर्चा व संवाद करण्याची मला संधी मिळाली. त्यापैकी एक प्रसंग आठवतो. पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी व्हीआयपी दौऱ्यांसाठी कॅन्व्हायमध्ये वापरण्यात येणारी वेगवान वाहने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी मला दिली होती. त्यावेळी दादांनी सहजच मला विचारले, 'या वाहनांची किंमत किती?' मी सांगितले - 'सुमारे पंधरा ते वीस लाख रुपये.' क्षणभर थांबून त्यांनी पुन्हा प्रश्न केला 'आणि तुमचे आयुक्त वापरतात त्या गाडीची किंमत?...' 'दहा लाख रुपये...' असे मी सांगताच दादा मिस्कीलपणे हसले आणि म्हणाले, 'म्हणजे सीपींपेक्षा जास्त महाग गाडीतून तुमचा अंमलदार प्रवास करणार तर।' त्या एका वाक्यातून त्यांचा मिस्कील स्वभाव त्यांनी जागा ठेवल्याचे स्पष्ट जाणवत होते.
असाच आणखी एक प्रसंग. सुनेत्रा पवार वहिनींनी नेहमीच घट्टे कुटुंबावर बहिणीची माया केली. पुणे पोलिस मुख्यालयाच्या नूतनीकरणाच्या उद्घाटनासाठी दादांना आमंत्रित केल्याचे मी वहिनींना सांगितले. त्या हसत म्हणाल्या, 'दादा बांधकामातील बारकावे आवर्जून पाहतात. काही उणे दिसले, तर तुमचे निश्चित कान टोचले जातील हे लक्षात ठेवा.' नेमके तसेच झाले. सहज लक्षातही न येणाऱ्या बांधकामातील काही उणिवा दादांनी दाखवून दिल्या. मात्र इमारत शंभर वर्षाहून अधिक जुनी असल्याने नूतनीकरणात आलेल्या मर्यादा सांगितल्यावर त्यांनी त्यावर समजूतदारपणे मार्गदर्शन केले. असे होते दादा!
Web Summary : A police officer recalls interactions with Ajit Dada, highlighting his attention to detail, concern for public welfare during COVID, and approachable nature.
Web Summary : एक पुलिस अधिकारी अजित दादा के साथ बातचीत को याद करते हैं, COVID के दौरान सार्वजनिक कल्याण के लिए उनकी चिंता और मिलनसार स्वभाव पर प्रकाश डालते हैं।