शहरं
Join us  
Trending Stories
1
उरफाटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
2
भूकंपासह अनेक मोठी संकट येणार, ज्वालामुखीचा उद्रेक, तीव्र हवामान बदल; बाबा वेंगाची २०२६ साठी भविष्यवाणी
3
बाजारात नफावसुलीचा जोर! एअरटेल-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये जोरदार घसरण; सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
4
भारताने रचण्यास सुरुवात केली 'इंद्रजाल'; पाकिस्तानने मग तुर्कीचा ड्रोन पाठवूदे नाहीतर चीनचा...
5
Sri Lanka Flood : पावसाचं थैमान! श्रीलंकेत भीषण पूर, ५६ जणांचा मृत्यू; ६० जण बेपत्ता, ६०० घरांचं मोठं नुकसान
6
"त्याला कशाला दोष देता?"; सुनील गावसकरांनी घेतली गौतम गंभीरची बाजू, दोषी कोण तेही सांगितलं
7
"ज्याच्यासाठी आमचं घर फुटलं, तोच माणूस माझ्याशी बेईमान झाला", धनंजय मुंडेंचा चढला पारा, प्रचारसभेत कोणावर 'वार'?
8
“शिवसेना–भाजप ही विचारधारेची युती, अशी युती..."; रवींद्र चव्हाणांना एकनाथ शिंदेंचे उत्तर
9
“३० वर्षांनी ‘मुंबई’चे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये”; राम नाईक यांनी विरोधकांना सुनावले
10
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
11
Virat Kohli: कोहली विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर; शतक ठोकताच बनेल क्रिकेटचा हुकमी 'ऐक्का'!
12
एकाच झटक्यात चांदी १६०० रुपयांपेक्षा अधिक महागली, सोन्याचे दरही वाढले; पाहा १४ ते २४ कॅरेट Gold रेट
13
लडाखबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; उपराज्यपालांकडून 'हे' अधिकार काढून घेतले...
14
"थकून घरी गेल्यावर नवरा बायकोने मच्छरदाणीत झोपा"; बांधकाम कामगारांवर बोलताना गिरीश महाजन यांचा सल्ला
15
बँक ग्राहकांनो लक्ष द्या! डिसेंबरमध्ये तब्बल १८ दिवस बँका बंद; सलग ५ दिवसांच्या सुट्ट्यांमुळे कामे खोळंबणार!
16
“OBC आरक्षणावरील टांगती तलवार कायम; भाजपा सरकारने दिशाभूल केली”; विजय वडेट्टीवारांची टीका
17
SMAT 2025 : प्रितीच्या संघातील पठ्ठ्याचा स्फोटक अवतार! शाहरुखच्या मिस्ट्री स्पिनरची धुलाई (VIDEO)
18
Meesho IPO: ₹२.८४ कोटींचे होणार ₹५२४५ कोटी; Meesho IPO बदलणार 'या' लोकांचं नशीब
19
Deepika TC : "फेकलेली फळं खाऊन..."; शेतमजूर बापाची लेक वर्ल्ड चॅम्पियन, दीपिका टीसीचा संघर्षमय प्रवास
20
Datta Jayanti 2025: 'दत्त येवोनिया उभा ठाकला' हा अनुभव तुम्हालाही येईल, 'अशी' घाला आर्त साद!
Daily Top 2Weekly Top 5

१९३ वर्षांपूर्वी बॉम्बेमध्ये कुत्र्यांवरून दंगल उसळली, तेव्हा.. ‘बॉम्बे डॉग रायट्स’चा इतिहास

By संदीप प्रधान | Updated: August 19, 2025 10:59 IST

१८३२ च्या ‘बॉम्बे डॉग रायट्स’ला मुंबई शहराच्या इतिहासात एक खास स्थान आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला असताना एक जुना धांडोळा..

संदीप प्रधान, सहयोगी संपादक, लोकमत, ठाणे

ब्रिटिश आमदनीत मुंबईतील काही क्लब व ठिकाणांच्या बाहेर ‘कुत्रे व भारतीय यांना प्रवेश बंद’ असे फलक लावलेले असायचे. ब्रिटिशांचा भारतीयांवरील राग एकवेळ समजू शकतो; पण कुत्र्यांवर राग असण्याची कहाणी तब्बल १९३ वर्षांपूर्वीची आहे. याच मुंबईत भटक्या कुत्र्यांमुळे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्याहून धक्कादायक म्हणजे त्या दंगलीचे नेतृत्व मुंबईतील शांतताप्रिय अशी ओळख असलेल्या पारशी समाजाने केले. त्यामध्ये त्यांना हिंदू, मुस्लीम, जैन धर्माच्या लोकांची साथ लाभली. १८५७चे बंड हे भारतीय ऐक्याचे उदाहरण मानले जाते. पण, मुंबई कॉस्मोपॉलिटन शहराने ब्रिटिशांविरुद्ध त्यापूर्वीच ऐक्याचे दर्शन घडवले.

सन १८३२. बॉम्बे (आजचे मुंबई) हे एक गजबजलेले बंदर व विविध संस्कृती आणि समुदायांचे वास्तव्य असलेले शहर तेव्हाही होते. त्यामध्ये पारशी समाजाने आपले व्यावसायिक कौशल्य, दानशूरपणाने आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. खरे तर शांतता हा पारशांचा स्थायिभाव, पण या समाजानेच शहराच्या इतिहासातील पहिल्या मोठ्या दंगलींपैकी एकाचे नेतृत्व केले आणि तेही भटक्या कुत्र्यांसाठी. या संघर्षाची मुळे थेट १८१३ मध्ये सापडतात. त्यावर्षी ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनी ‘बॉम्बे’मधील कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी एक नियम जाहीर केला. भटक्या कुत्र्यांना ठार मारण्यास परवानगी दिली होती. काही वर्षे हा नियम मुक्तहस्ते अंमलात आला. मात्र तरीही १८३२ पर्यंत शहरातील कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली आणि प्रशासनाने हा नियम अधिक कठोरपणे लागू केला. एक कुत्रा मारल्याबद्दल आठ आणे बक्षीस देण्यात येत असे.

लवकरच या धोरणाचे अनियंत्रित परिणाम दिसू लागले. बक्षिसाच्या हव्यासाने कुत्रे पकडणाऱ्यांनी फक्त भटक्या कुत्र्यांवरच नव्हे, तर पाळीव कुत्र्यांवरही हल्ला करायला सुरुवात केली. घरात घुसून कुत्रे मारण्याच्या घटना घडू लागल्या. यामुळे लोकांमध्ये व मुख्यत्वे पारशी समाजात संताप पसरला. पारश्यांसाठी कुत्रा हा फक्त पाळीव प्राणी नव्हे, तर त्यांच्या झोराष्ट्रीयन धर्माचा अविभाज्य भाग होता. पारशी धार्मिक ग्रंथांनुसार कुत्र्यांना स्वर्गाचे द्वारपाल मानले जात असे आणि त्यांची दृष्टी वाईट शक्तींना दूर करते असे मानले जाई. कुत्र्यांची अंदाधुंद हत्या हा त्यांच्या धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक प्रथा यांच्यावर थेट आघात होता.

या संतापाचा विस्फोट ६ जुलै १८३२ रोजी झाला. बॉम्बेच्या फोर्ट भागात कुत्रे पकडणारे आपले काम करत होते. त्यातच एकत्र आलेल्या सुमारे २०० पारशी बांधवांनी आंदोलन सुरू केले. यात दोन पोलिस हवालदार जखमी झाले. हळूहळू आंदोलनाचे लोण पसरले. दुकाने, व्यापार बंद झाले. हिंदू, जैन आणि मुस्लीम समाजही  या आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनाच्या तीव्रतेने व मुंबईतील नागरिकांच्या एकोप्याने ब्रिटिश अधिकारी थक्क झाले. लष्करी तुकड्या बोलावून दंगल थोपवण्याचा प्रयत्न झाला. जमावासमोर दंगलविरोधी कायदा वाचण्यात आला. काही पारशी नेत्यांना अटक केली गेली. या अटकेमुळे संताप आणखीनच वाढला. शहरातील व्यापारउदीम ठप्प झाला. ब्रिटिशांवर दबाव निर्माण झाला. अखेर ब्रिटिशांना नमते घ्यावे लागले.

ब्रिटिश प्रशासनाने पारशी नेत्यांशी चर्चा सुरू केली. प्रसिद्ध व्यापारी सर जमशेटजी जीजीभॉय यांच्या नेतृत्वाखाली या समाजाने कुत्र्यांची कत्तल थांबवण्याची मागणी करून भटक्या कुत्र्यांना शहराबाहेर हलविण्याचा प्रस्ताव मांडला. शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी ब्रिटिशांनी ही मागणी मान्य केली. कुत्र्यांची कत्तल अनिवार्य करणारा नियम मागे घेतला. अटक केलेले पारशी नेते मुक्त केले. या १८३२च्या ‘बॉम्बे डॉग रायट्स’ने शहराच्या इतिहासावर कायमस्वरूपी छाप सोडली. या घटनेतून पारशी समाजाची प्रभावी संघटनशक्ती आणि नेतृत्वगुण अधोरेखित झाले. त्याचबरोबर विविध धर्मीयांच्या एकतेचेही दर्शन घडले. ब्रिटिश सत्ताधाऱ्यांच्या मनमानी धोरणांना स्थानिकांच्या धार्मिक भावना किती जोरकस आव्हान देऊ शकतात, हे या दंगलीने दाखवून दिले. या संघर्षाचा केंद्रबिंदू प्राण्यांबद्दलची करुणा होती. या घटनेला आज १९३ वर्षे झाली, तरी भटक्या कुत्र्यांची समस्या अजून सुटलेली नाही.

sandeep.pradhan@lokmat.com

टॅग्स :dogकुत्राMumbaiमुंबई