धुळे : कोरोना महामारीच्या संकटात सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत असून तरुणांनी रक्तदान व प्लाझ्मा दान करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन आपले योगदान द्यावे, असे आवाहन आ. कुणाल पाटील यांनी केले. ते सावळदे येथे झालेल्या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमात बोलत होते.
महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त धुळे तालुक्यातील सावळदे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आ. कुणाल पाटील यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात बोलताना आ. कुणाल पाटील यांनी तरुणांना प्रोत्साहित करीत रक्तदान करण्याचे आवाहन केले. कोरेना महामारीत कोरोनाग्रस्त रुग्णांना रक्ताबरोबरच प्लाझ्माची मोठ्या प्रमाणात गरज पडत आहे. अशा वेळी तरुणांनी खऱ्या अर्थाने मदतीसाठी पुढे येणे गरजेचे आहे. कोरोना हे एक राष्ट्रीय संकट असून तरुणांनी कोरोनाग्रस्तांची मदत करून आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी शेवटी केले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे यांनीही मार्गदर्शन केले. रक्तदान शिबिरात एकूण 28 तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. कार्यक्रमाला गरताडचे माजी सरपंच अरुण पाटील यांच्यासह सावळदे येथील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते आकाश देवरे यांनी तसेच दशरथ देवरे, राहुल देवरे, संग्राम देवरे, योगेश देवरे, झुंबर देवरे, कल्पेश देवरे, शकील खाटीक, महाराणा प्रताप मित्रमंडळ पदाधिकारी, नवजीवन ब्लड बँकेचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.