अपघात होऊ नये यासाठी शहरातील वर्दळीच्या ठिकाणी अतिक्रमण काढून रस्त्यांची रुंदी वाढविण्यात आली. रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकून वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पण, काही वाहनधारकांकडून मात्र राँगसाइडचा आधार घेतला जातो. वेळ वाचेल हा उद्देश असलातरी अपघाताचा धोका हा टळलेला नाही. गेल्या वर्षभरात राँग साइडने केवळ बोटावर मोजण्याइतके अपघात झाले आहेत. मृत्यू मात्र एकाचाही झालेला नाही़
ही आहे राँग साइड
१) वाडीभोकर रोड
नेहरु चौकापासून सुरू होणारा रोड थेट वाडीभोकरपर्यंत वन वे करण्यात आलेला आहे. या भागात भूमिगत गटारीचे काम असल्याचे निमित्त करुन अनेक जण राँग साइडने वाहने टाकून मोकळी होतात.
अपघातांना निमंत्रण
राँग साइडने वाहन टाकून बऱ्याच जणांकडून वावर वाढलेला असताना अपघाताचा धोका आता दिवसेंदिवस वाढत आहे. या भागात महाविद्यालय असून, पंचायत समितीदेखील आहे. अपघाताला आमंत्रण मिळू शकते.
पोलीस असून नसून
नेहरू चौकात पोलिसांची नेमणूक पहावयास मिळते. पण, त्यांच्या अनुपस्थितीनंतर मात्र वाहनधारकांकडून नियमांची पायमल्ली होताना दिसून येते. वाहनधारकांनी नियमांची अंमलबजावणी करावी.
२) दत्तमंदिर परिसर
महात्मा गांधी पुतळ्यापासून ते दत्तमंदिर आणि पुढील भागात वन-वे तयार करण्यात आलेला आहे. या भागात कॉलेज असल्यामुळे आणि देवपूर बसस्थानक असल्यामुळे नागरिकांचा वावर वाढत आहे.
अपघाताना आमंत्रण
दत्तमंदिर चौक आणि परिसरात काही वेळेस पोलिसांची नेमणूक असल्याचे दिसून येते. याच भागात भाजीविक्रेत्यांसह नागरिकांची वर्दळ वाढली आहे. वन वे असूनही नागरिकांकडून बिनधास्तपणे वाहने राँग साइडने टाकली जातात.
पोलीस असून नसून
काहीवेळेस दत्तमंदिर चौकात पोलिसांची नेमणूक असते. पोलीस असल्याने वाहनधारकांकडून नियमांचे पालन केले जाते. पण ज्या वेळेस या भागात पोलीस नसतील त्यावेळेस काही वाहनधारकांकडून नियमांची पायमल्ली होते.
३) मॉडर्न रस्ता
शहरातील फाशी पूल चौकापासून सुरू झालेला रस्ता पुढे दसेरा मैदानापर्यंत तयार करण्यात आलेला आहे. त्याला मॉडर्न रस्ता असे नामकरणदेखील करण्यात आलेले आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्त्यावर दुभाजक टाकण्यात आलेला आहे.
अपघाताला आमंत्रण
मॉडर्न रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढलेले होते. ते काढण्यात आल्याने रस्त्याची रुंदी वाढली आहे. याठिकाणी दुभाजक टाकण्यात येऊनदेखील राँग साइडने वाहने जात असल्याचे दिसून येते.
पोलीस असून नसून
या भागात पोलिसांची कधी तरी नेमणूक असल्याचे दिसून येते. परिणामी पोलीस नसल्याने काही वाहनधारकांकडून नियमांची पायमल्ली होताना दिसून येते. राँग साइडने वाहने चालविण्याचे प्रकार वाढत आहे.
राँग साइड : वर्षभरात जमा
झाला शेकडो रुपयांचा दंड
- शहरातील वर्दळीच्या ठिकाणी आणि प्रमुख चौकात वाहतूक शाखेचे कर्मचारी दिसून येतात. त्यांच्यासमोर कोणी राँग साइडने येत असेल वा जात असेल तर त्यांच्याकडून दंड आकारला जातो.
- गेल्या वर्षभरात असे प्रकार कमीच असलेतरी पोलिसांचे अशा वाहनधारकांवर बारकाईने लक्ष असते. अशा वाहनधारकांकडून दंड आकारण्यात आल्याने तो शेकडोंच्या घरात आहे़
- ज्या ठिकाणी वन-वे करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी आवर्जून अशी वाहने नियम मोडून येत असतील अशांवर दंड आकारण्यात आलेला आहे़
शहरातील वाहनधारकांनी नियमांचे पालन करून वाहन चालविणे गरजेचे आहे. जेणे करून अपघात होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी. नियमांने वाहन चालविल्यास अपघात होणार नाही. राँग साइडने वाहन कोणीही चालवू नये.
- संगीता राऊत
सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा
शहरात गेल्या वर्षभरातील अपघात - २६
मृत्यू : ०२
जखमी : २७
राँग साइडमुळे झालेले अपघात - ०४
मृत्यू : ००
जखमी : ०४