धुळे - महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कमी मिळकत असलेल्यांचे जगणे कठीण झाले आहे. असे असले तरी तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या कोतवालांचा चप्पल भत्ता मात्र केवळ दहा रुपये इतका आहे.
पूर्वीपासून कोतवालांना मानधनासोबतच चप्पल भत्ता दिला जातो. महागाई वाढली तरी त्यात कोणतीही वाढ झाली नाही. त्यामुळे दहा रुपयात कुठे चप्पल मिळते का हो ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
तलाठी कार्यालयात कोतवाल मदतनीस म्हणून काम पाहतात. शेतसारा गोळा करण्यासाठी तलाठ्याला मदत करतात. तसेच विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होते त्यावेळी पंचनाम्यासाठी मदत करतात. मात्र त्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. पदोन्नती मिळावी अशी मागणी कोतवाल संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
२०११ पासून पदोन्नती नाही ...
कोतवालांना २०११ सालापासून पदोन्नती मिळालेली नाही. त्याबाबत त्यांनी राज्य शासनाकडे वेळोवेळी मागणी केली आहे. मात्र त्यांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. पदोन्नतीच्या मागणीसाठी त्यांनी आंदोलने, उपोषणे व मोर्चेही काढले; मात्र काहीएक फायदा झाला नाही. तुटपुंज्या मानधनावर जिल्ह्यातील कोतवालांना काम करावे लागत आहे. याकडे शासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी संघटनेने केली आहे.
कामांची यादी भली मोठी ..
तलाठ्याचा मदतनीस म्हणून कोतवाल काम करतो. गावस्तरावर महसूल विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक यांना मदत करणे. दुष्काळ, अतिवृष्टी, शेतीचे नुकसान झाल्यास शेतात जाऊन पंचनामा करण्यासाठी मदत करणे. दुष्काळ यादी, गावातील नुकसानीची माहिती प्रशासनाला देणे, त्यांना सहकार्य करणे . गावस्तरावर राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची देखभाल करणे आदी कामे कोतवालांना करावी लागतात .
अपुऱ्या मानधनात कसे भागणार ?
महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोलसह, गॅस व इतर वस्तूचे दर सातत्याने वाढत आहेत. वाढत्या महागाईप्रमाणे आमच्या मानधनात कोणतीही वाढ होत नाही. आमचे मानधन जसेच्या तसे आहे. चप्पल भत्तासाठी केवळ दहा रुपये दिले जातात. दहा रुपयात चप्पल मिळणे शक्य तरी आहे का? महागाई वाढत आहे त्यानुसार मानधनातही वाढ करावी अशी आमची मागणी आहे.
- कोतवाल
गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या मानधनात वाढ झालेली नाही. मानधन वाढावे यासाठी शासनाकडे वेळोवेळी मागणी केली आहे. मात्र शासन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. मागच्या १० वर्षांपासून पदोन्नतीचा प्रश्नही रखडला आहे. तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहोत. मानधन वाढवून देण्याची आवश्यकता आहे.
- कोतवाल