सोडल्याने नेरसह भदाणे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे पाणी दूषित झाले होते. विहिरीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी दिले होते. तेव्हा ते पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेने दिला आहे. यामुळे अजूनही दोन्ही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असून, ग्रामपंचायतसह सामाजिक कार्यकर्ते दीपक खलाणे, देवीदास माळी, कृष्णा खताळ यांच्याकडून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
माथेफिरू टँकरचालकाने नेरजवळील सुरत -नागपूर महामार्गावरील नवे भदाणे गावालगत नाल्यात रसायन सोडल्यामुळे ते पांझरा नदीत आले होते. त्यामुळे नदीतील मासे व जीवजंतूंना जीव गमवावा लागला, तर नेर आणि भदाणे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी या पांझरा नदीकाठावर असल्याने त्यांच्या पाण्यातही रसायनाचे तरंग आल्यामुळे हे पाणी नागरिकांसाठी जीवघेणे ठरणार होते. त्यामुळे तातडीने नेर ग्रामपंचायतीने गावात दवंडी देऊन चार दिवस पाणीपुरवठा बंद केला होता. त्यानंतर या पाण्याचे नमुने जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. या प्रयोगशाळेने या पाण्याचे नमुने तपासून ग्रामपंचायतीला अहवाल दिला आहे. त्यानुसार नेर आणि भदाणे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे या दोन्ही गावांतील ग्रामस्थांना पाण्यासाठी हाल सोसावे लागणार आहेत.
असा आहे अहवाल....
पिण्यास अयोग्य आढळलेल्या पाण्यावर योग्य प्रमाणात क्लोरिनची प्रक्रिया करून व सीक्ष्मजीवीय पुनर्तपासणीमध्ये पिण्यास योग्य असल्यास खात्री झाल्यानंतरच ते पाणी पिण्यास वापरण्यात यावे, असा स्पष्ट अभिप्राय जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेचे मुख्य अनुजीव शास्त्रज्ञ यांनी दिला आहे.
ग्रामपंचायतीसह सामाजिक कार्यकर्ते धावले. गावाला पाणीपुरवठा करणारे पाणी दूषित झाल्याने पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे नेर येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक खलाणे, देवीदास माळी यांनी टँकरने गावात पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे, तसेच ग्रामपंचायतीने पाणी सोडून ग्रामस्थांना हे पाणी गरम करून केवळ अन्य कामांसाठी वापरावे, असे आवाहन केले आहे. भदाणे येथेही सामाजिक कार्यकर्ते कृष्णा खताळ यांनी टँकरने गावाला पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
पुन्हा प्रयोगशाळेत नमुने पाठविले.
शुक्रवारी पाणी तपासणीचा अहवाल आला आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायतीने पुन्हा विहिरीतील पाण्याचे नमुने घेऊन ते जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. हा अहवाल आल्यानंतच नागरिकांना पिण्यासाठी पाणी सोडावे की नाही, याचा निर्णय ग्रामपंचायत घेणार आहे.