टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 10:43 PM2019-04-13T22:43:16+5:302019-04-13T22:43:56+5:30

शिंदखेडा : महात्मा फुले जयंतीनिमित्त सत्यशोधक युवा मंचचा अनोखा उपक्रम

Water scarcity-hit villages | टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी

dhule

Next

शिंदखेडा : महात्मा फुले जयंतीनिमित्त सत्यशोधक युवा मंचच्यावतीने टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सत्यशोधक युवा मंचतर्फे शहरातील माळी दरवाजा येथे प्रतिमापूजन करून मिरवणुकीवर होणारा खर्च वाचविण्यात आला. त्यातून वरूळ घुसरे व होळ या टंचाईग्रस्त गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. तीव्र पाणीटंचाईने त्रस्त नागरिकांसाठी पिण्याचे पाणी व गुरांसाठी हाळ भरून पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे नागरिकांना व पशुधनास पाणी मिळाल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी युवकांच्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले.
यंदा दुष्काळाची झळ लक्षात घेऊन विविध कार्यक्रमांसाठी खर्च न करता शिंदखेडा तालुक्यातील अतिशय तीव्र पाणीटंचाई असलेल्या गावांची निवड करून मोफत पाणी पुरवठा या जयंतीनिमित्ताने सुरू करण्यात आला. यासाठी देणगी स्वरूपात टँकरभर पाण्याची मागणी करण्यात आली. हा उपक्रम चांगला असल्याने लोकांनीही सढळ हाताने या युवकांना मदत केली. या युवकांनी वरूळ व होळ गावातून या उपक्रमाची सुरुवात देखील केली आहे. दुपारनंतर होळ या गावी रात्री ८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा करण्यात आला. या दोन्ही गावात या युवकांमार्फत दररोज एका टँकरने पाणीपुरवठा होणार आहे. त्यानंतर हातनूर या गावातही पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सल्लागार संजय महाजन यांनी केले. मंडळाचे अध्यक्ष प्रा.अनिल माळी यांनी गावातील नागरिकांना उपक्रमाची माहिती देऊन पाण्याचे महत्व स्पष्ट केले.
याप्रसंगी मंडळाचे कार्याध्यक्ष प्रविण माळी, उपाध्यक्ष, योगेश माळी, खजिनदार मुकेश माळी, सचिव कुणाल जाधव, सहसचिव भरत माळी, व्यवस्थापक वासुदेव माळी, सल्लागार अ‍ॅड.प्रशांत जाधव, मंडळाचे सभासद निवृत्ती माळी, हरीश माळी, उमाकांत माळी, किशोर माळी, नरेश परदेशी, विकास कोळी, ज्ञानेश्वर माळी, केशव माळी, गणेश माळी, प्रकाश माळी आदी उपस्थित होते.
या उपक्रमासाठी शहरातील विविध राजकिय तसेच सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीनी आर्थिक व टँकर स्वरूपात मदत उपलब्ध करून दिली. येत्या काही दिवसांसाठी सदर उपक्रमाद्वारे विविध गावात पिण्यासाठी तसेच गुरांसाठी पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच कुणाला काही मदत करायची असेल तर त्यांनी टँकर स्वरूपात पाण्याची मदत करण्याचे आवाहनही केले.

Web Title: Water scarcity-hit villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे