चिमठाणे : शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे ते खलाणे रस्त्याची पार दुरवस्था झाली. यामुळे प्रवासी, वाहनधारक, ग्रामस्थ सारेच वैतागले आहेत. तरीही गेल्या दहा ते बारा वर्षांपासून संबंधित विभागाला चिमठाणे ते खलाणे रस्ता कामासाठी मुहूर्त सापडलेला नाही. यामुळे संतप्त प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत.चिमठाणे ते खलाणे रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. खड्ड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डे हेच समजू नये, अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने या रस्त्याचे काम करावे, अशी मागणी होत आहे. मात्र, संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या रस्त्यावरुन पायी चालणेही कठीण झालेले असले तरी नाईलाजस्तव नागरिकांना या रस्त्यावरुन ये- जा करावी लागत आहे.चिमठाणेकडे जाताना या रस्त्याने जावे लागते. वाहन चालवताना अक्षरश: कसरत करावी लागते. रस्ता दुरवस्थेमुळे वाहन मिळत नाही. बस देखील या रस्त्याने जात नाही. अनेक दिवस झाले बस देखील बंदच आहे. दळण-वळणासाठी मार्ग नसल्याने मोठे नुकसान होते. चिमठाणे येथील शेतकरी, ग्रामस्थांना दोंडाईचा, नंदुरबार येथे शेतमाल विक्रीसह विविध कारणांनी जावे लागते. मात्र, १० ते १५ वर्षांपासून एकाही अधिकाऱ्याने ग्रामस्थांच्या व्यथेकडे ढुंकून पाहिलेले नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.खलाणे गावातील नागरिक रात्री उशिरापर्यंत कामधंद्यानिमित्त चिमठाणे गावाकडे असतात. त्यामुळे त्यांना रात्रीअपरात्री या धोकेदायक बनलेल्या रस्त्याचा वापर करुनच परतावे लागते.दरम्यान, या रस्त्यासाठी लाखोंचा निधी मंजूर करण्यात आल्याचे समजले. परंतू त्यानंतरही रस्त्याचे काम न झाल्याने ग्रामस्थ बुचकळ्यात पडले आहे. संबंधित विभागाने लवकरात लवकर या रस्त्याचे काम करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
चिमठाणे-खलाणे रस्त्याची वाट बिकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 22:23 IST