लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : शहरातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने परिसर कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला असून १४ दिवस संचारबंदी राहणार आहे.शहरातील किसान कॉलनीत एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. यामुळे कोरोना रुग्णांची संख्या सात झाली आहे. त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. स्टेशनरोड वरील किसान कॉलनीत रुग्ण आढळून आल्याने किसान कॉलनीसह संपूर्ण प्रभाग क्रमांक ११ प्रशासनातर्फे सील करण्यात आला असून १४ दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच शहरात इतर ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. इतर व्यवहार सुरू करावे किंवा नाही, याबाबत सोमवारी निर्णय होणार असल्याचे नगरपालिका प्रशासन प्रमुख प्रल्हाद देवरे यांनी सांगितले.संपूर्ण शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद आहेत. ज्या भागात रुग्ण आढळून आहेत त्या भागात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत आहे. अटी व शर्तीचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्ती व दुकानदारांवर कार्यवाही करण्यात येणार आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, गरज नसताना घराबाहेर पडू नये, मास्क वापरावे, असे आवाहन तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी केले आहे. शहरात नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाच्यावतीने नगरपंचायत मुख्याधिकारी देवेंद्रसिंह परदेशी, प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे, अभियंता ईश्वर सोनवणे, नगरपंचायत कर्मचारी, तलाठी तुषार पवार, पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्यासह कर्मचारी, माजी सैनिक यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
प्रभाग ११ कटेन्मेंट झोन, १४ दिवस संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 22:26 IST