लोकमत न्यूज नेटवर्क
निजामपूर : निजामपूर शहराबाहेरून वळण रस्ता त्वरित व्हावा, अशी मागणी निवेदनाद्वारे ग्रामपालिकेच्यावतीने मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नासिक यांची भेट घेऊन करण्यात आली आहे.
सरवड - ब्राह्मणवेल या राज्य मार्ग क्रमांक १३ चे निजामपूर गावातील मध्यवस्तीतील मुख्य बाजारपेठेतून निर्माण कार्य होत आहे. यामुळे अवजड वाहनांची व अन्य वाहनांची वर्दळ वाढेल आणि या रस्त्याच्या दुतर्फा शाळा, बँका, दवाखाने, दुकाने, मंगल कार्यालये, मंदिर, रहिवासी घरे असून, वाढणाऱ्या वर्दळीमुळे भविष्यात दुर्घटना व प्राणहानी होण्याची भीती व्यक्त होते आहे. तसेच गावातील प्रदूषणही वाढेल. यातून ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्नसुद्धा गंभीर होऊ शकतो. यावर उपाय म्हणजे गावासाठी बाह्यवळण रस्ता होणे गरजेचे आहे. ग्रामस्थांची व परिसरातील जनतेची ही मागणी जुनीच आहे. बाह्यवळण रस्त्यासाठी प्राथमिक अहवालसुद्धा तयार असून, मंजुरीची प्रतीक्षा आहे. निजामपूर गावातून शेवाळी - नेत्रन हा ७५३ बी राष्ट्रीय महामार्गही जातो. या महामार्गावर सध्या खूप मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. ग्रामस्थांचे आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने निजामपूर गावासाठी त्वरित बाह्यवळण रस्ता व्हावा, अशी मागणी प्रत्यक्ष भेटीत निवेदनातून करण्यात आली आहे. निजामपूर शहराबाहेर वळण रस्ता तत्काळ मंजूर होण्याबाबत विनंतीवजा निवेदन मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग नासिक यांना सरपंच प्रतिनिधी मिलिंद भार्गव व जाकीर तांबोळी यांनी दिले. या निवेदनाच्या प्रती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, कृषिमंत्री दादा भुसे, साक्री आमदार, बांधकाम सचिव, सार्वजनिक बांधकाम (रस्ते), मंत्रालय, मुंबई अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे यांना पाठविल्या आहेत.
180921\img-20210917-wa0266.jpg
मुख्य अभियंता सार्व बांधकाम नासिक याना निवेदन देतांना मिलिंद भार्गव,जाकीर तांबोळी