शिरपूर (जि.धुळे) : मध्यप्रदेशातून कत्तलीसाठी जनावरांची तस्करी होत असल्याच्या माहितीवरून सांगवी पोलिसांनी महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्यावर सापळा रचला. २ वाहनांमध्ये ९७ जनावरे आढळून आली. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून एक चालक पसार होण्यात यशस्वी झाला. दरम्यान, गाडीसह ३० लाख ४५ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला.४ रोजी पहाटेच्या सुमारास सांगवी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील हे महामार्गावर गस्त घालीत असतांना एका खबऱ्याने मध्यप्रदेशातून कत्तलीसाठी जनावरांनी भरलेल्या गाड्या जाणार असल्याची माहिती दिली़. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, हवालदार संजय नगराळे, शामसिंग वळवी, संजीव जाधव, राजू गिते, राजेश्वर कुवर यांच्या पथकाने हाडाखेड तपासणी नाक्यावर सापळा रचला. सेंधवाकडून एम.पी. ०९ एच.जी. ६०३९ व यु.पी. २१. ए.एन. २९८५ या क्रमांकाच्या दोन वाहनांची तपासणी केली. चालकांना गाडीत काय आहे, याची विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्याचवेळी एका गाडीचा चालक पळून गेला तर सहचालक मुक्तीहार नबीनूर मुलतानी रा. बोतलगंज (मध्यप्रदेश) याची चौकशी केली असता गाडीत गोऱ्हे असल्याचे सांगितले. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता त्यात ५० गुरे दोन कप्प्यात कोंबलेले दिसून आले. दुसऱ्या वाहनाचा चालक फिरोज खान इस्माईल खान रा. चंद्रनगर सेक्टर इंदौर यानेही गाडीत गुरे असल्याची हिती पोलिसांना दिली. पोलिसांच्या तपासणीत ४७ गुरे दिसून आली. दोन्ही वाहनात एकूण ९७ गुरे आढळून आली. या दोन्ही वाहन चालकांकडे गुरे वाहतुकीचा कुठलाही परवाना नसल्यामुळे दोन्ही वाहनांची किंमत २५ लाख रूपये व जनावरांची किंमत ५ लाख ४५ असा एकूण ३० लाख ४५ हजाराचा ऐवज जप्त केला.
शिरपूर तालुक्यातील हाडाखेड तपासणी नाक्यावर गुरांची वाहतूक करणारे वाहन पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 13:26 IST