धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील पनाखेड शिवारात एका खासगी वाहनातून स्पिरीटची वाहतूक होत होती. ही माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचला. पथकाने केलेल्या कारवाईत वाहनासह २५ हजार ७०० रुपये किमतीचे स्पिरीट जप्त केले. संशयित वाहन सोडून फरार झाला आहे.
शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथील सीमा तपासणी नाक्यावरील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक बी. एस. महाडिक यांना खासगी वाहनातून स्पिरीटची वाहतूक होती असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार, निरीक्षक महाडिक यांच्यासह पथकाने संबंधित वाहनाचा शोध घेतला असता पनाखेड शिवारात महामार्गाच्या बाजूला संशयित एमएच १८ एए ३८५७ हे वाहन आढळले. पथकाला पाहताच चालक वाहन सोडून फरार झाला. पथकाने वाहनाची तपासणी केली असता २०० लीटर क्षमतेच्या दोन ड्रममध्ये २२ हजार रुपयांचे, तसेच ३५ लीटर क्षमतेच्या दोन ड्रममध्ये ३ हजार ७०० रुपयांचे शुद्ध स्पिरीट आढळले. या स्पिरीटची विनापरवानगी वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. पथकाने २५ हजार ७०० रुपयांच्या स्पिरीटसह चार लाखांचे महिंद्रा कंपनीचे बोलेरो वाहन जप्त करण्यात आले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त के. बी. उमाप, संचालिका उषा वर्मा, विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महाडिक, सहायक दुय्यम निरीक्षक एस. पी. कुटे, कर्मचारी किरण वराडे, केतन जाधव, भालचंद्र वाघ, वाहनचालक रवींद्र देसले यांच्या पथकाने ही कारवाई केली.