भूषण चिंचोरे
धुळे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे स्कूल बसचालकांवर बेरोजगारीची वेळ आल्याने काही चालकांनी भाजीपाला विकण्यासाठी, तर काहींनी खाद्यपदार्थ विकण्यासाठी स्कूल बसचा वापर सुरू केला आहे.
मागील वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने शिकत आहेत. मात्र त्यांना शाळेत वेळेत सोडणाऱ्या व शाळा सुटल्यानंतर घरी सुरक्षित घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. शाळा बंद झाल्याने त्यांची मिळकत मागील दीड वर्षांपासून थांबली आहे. दीड वर्षातील बहुतांश काळ कडक लॉकडाऊन लावण्यात आलेले होते. त्यामुळे त्यांना प्रवासी वाहतूकदेखील करता येणे शक्य नव्हते. त्यामुळे काही स्कूल बसचालकांनी आपल्या वाहनाचा वापर करत भाजीपाला विक्री, तर काहींनी पाव, खारी आदी खाद्यपदार्थांची विक्री सुरू केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा सुरू कराव्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.
गाडीवरील कर्ज कसे फेडणार
कोरोना संसर्गामुळे मोठे नुकसान झाले आहे. दीर्घ काळापासून शाळा बंद असल्याने वाहने जागेवरच उभी आहेत. आता वाहनांसाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे, याची चिंता सतावते आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याची गरज आहे.
- राजू माळी, गाडीमालक
कोरोनापूर्वी रिक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जायचो. मात्र कोरोनामुळे शाळा बंद झाल्याने रोजगार बुडाला आहे. लॉकडाऊन असल्याने प्रवासी वाहतूकदेखील करता येत नव्हती. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. आता शाळा सुरू होतील, अशी अपेक्षा आहे.
गोपाल वाघ, गाडीमालक
चालकांचे हाल वेगळेच
रिक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची ने-आण करायचो. आता मात्र शाळा बंद असल्याने पर्यायी व्यवसाय म्हणून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. भाजीपाला घेऊन जाण्यासाठी रिक्षाचा वापर करतो व स्टॉल लावून भाजीपाला विक्री करत आहे.
- संदीप पाटील
शाळा बंद होतील व रोजगार जाईल, असे कधीच वाटले नव्हते. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा बंद झाल्याने मिळकत पूर्णपणे थांबली होती. कोरोनाच्या काळात प्रवासी वाहतूकदेखील करू शकत नव्हतो. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात नारळ विक्री, खारी विक्री आदी व्यवसाय केले.
विलास निकम
असा होतोय स्कूल बसचा वापर
१ - देवपूर येथील रहिवासी संदीप पाटील हे आपल्या रिक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची ने-आण करीत होते. मात्र कोरोनाचे संकट आल्यानंतर त्यांचा रोजगार पूर्णपणे गेला. त्यामुळे त्यांनी रिक्षाचा वापर करीत भाजीपाला विक्री सुरू केली आहे.
२ - संदीप पाटील आपल्या रिक्षाचा वापर भाजीपाला विक्रीसाठी करत आहेत. भाजीपाला मार्केट येथून रिक्षातून भाजीपाला आणतात व शहरात विविध ठिकाणी स्टॉल लावून भाजीपाला विक्री करतात.
३ शाळा बंद झाल्याने स्कूल बसचालक विलास निकम यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली होती. त्यामुळे त्यांनी नारळ विक्री तसेच खारी-टोस्ट विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला आहे.