एका गटाकडून महिलेने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, ग्रामपंचायत निवडणुकीत फॉर्म रद्द झाल्याच्या कारणावरून जमावाने घरी गर्दी केली. एकाने गळा दाबून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्याने हातातील ब्लेड घेऊन मारहाण केली. विनयभंगही केला. घरातील वस्तूंची तोडफोडही करण्यात आली. एवढेच नव्हेतर घरात ठेवलेले १ लाख ५० हजार रुपये देखील घेऊन एकजण पळून गेला. भांडण सोडविण्यासाठी आलेले जगतसिंग बुधेसिंग गिरासे, विजय वामन भामरे यांना हाताबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. दगडफेकीसह घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचीही तोडफोड करून नुकसान करण्यात आले. ही घटना रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी युवराज देवीदास पाटीलसह १३ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला.
दुसऱ्या गटाकडूनही महिलेने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, मुलाने दोंडाईचा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचा राग मनात धरून घरी गर्दी करण्यात आली. मुलासह महिलेला शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. गळ्यातील मंगळसूत्र, बांगड्या फोडून टाकत लाेखंडी सळईने पतीलाही मारहाण करण्यात आली. घरात ठेवलेले शेतीकामांचे २५ हजार रुपये काढून घेतले. घरातील वस्तूंचे नुकसान करत शिवीगाळ करीत दमदाटी करण्यात आली. ही घटना रविवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात भिकनराव भटू पाटील याच्यासह जमावाविरुद्ध गुन्हा दाखल झाला.