लोकमत न्यूज नेटवर्कसोनगीर : येथील शिरपुरकडे जाणाºया बस थांबा जवळील प्रवाशी निवारा हा कचराकुंडीचे ठिकाण बनले आहे. सोनगीरसह परिसरातील नागरिकांचा सुमारे दोन दशकापेक्षा जास्त काळापासून बस स्थानकासाठी संघर्ष सुरू आहे. गेल्या काही वर्षात लोकप्रतिनिधींसोबत चर्चा, बैठक, महामंडळाच्या अधिकाºयांकडून जागेचा पाहणी दौरा एवढयापुरताच हा येथील अद्ययावत बस स्थानकाचा प्रश्न मर्यादित राहिला आहे. त्यामुळे किमान येथे असलेल्या शिरपुरकडे जाणाºया थांबाजवळील महामंडळाचा प्रवाशी निवाºयाची दुरूस्ती करून प्रवाशांचे होणारे हाल थांबवावे, अशी माफक अपेक्षा आहे.शिरपुर व धुळेकडे जाणाºया प्रवाशांसाठी थांबा परिसरात महामार्ग चौपदरीकरण करणाºया कंपनीने प्रवाशी निवारे बनवलेत मात्र ते थांब्यावर उपस्थित प्रवाशांच्या तुलनेत तोकडे आहेत. यामुळे ऊन, वारा, पावसापासून संरक्षणासाठी प्रवाशांना जवळ असलेल्या भुयारी मार्गात अथवा जवळील व्यवसायिक दुकानाचा आसरा घ्यावा लागतो. मात्र या मार्गावर नेहमी वाहनाची वर्दळ सुरु असते. यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.दरम्यान, येथील शिरपुरकडे जाणाºया बस थांब्यावर महामंडळाचा पूर्वीपासूनचा एक जुना पिकअप शेड आहे. बºयाच वर्षापासून या पिकअप शेडच्या समोर व्यावसायिक टपºयांचे अतिक्रमण होते. गेल्यावर्षी पोलीस प्रशासन व ग्रामपंचायतीच्या मदतीने अतिक्रमित दुकाने हटवण्यात आली होती. यामुळे दुर्लक्षित शेड नागरिकांच्या दृष्टीस पडू लागले. मात्र, सध्या असलेल्या शेडच्या भिंती तसेच वरील छपराची पार दुरवस्था झाली असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेला पिकअप शेड सध्या निरुपयोगी ठरत आहे. या शेडची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. बस स्थानकासाठी जागादरम्यान येथे सर्व सर्वसुविधायुक्त बस स्थानक असावे, यासाठी ग्रामपंचायतीने महामार्गालगत पोलीस ठाण्यासमोर पाच एकर इतकी जागा आरक्षित ठेवली आहे. गेल्यावर्षी महमंडळाच्या अधिकाºयांनी याठिकाणी येऊन पाहणी देखील केली होती. व लवकरच जागा ताब्यात घेऊन वरिष्ठस्तरावर वेगवेगळ्या मान्यता घेऊन नागरिकांसाठी अद्ययावत बसस्थानक तयार करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, स्थानकाची अजून प्रतिक्षाच आहे. प्रस्तावित अद्ययावत बस स्थानकचा प्रश्न सोडविण्यासाठी माजी पं. स. सदस्य अविनाश महाजन, माजी सरपंच केदारेश्वर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहेत. लवकरच हा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा माजी ग्रा.पं. सदस्य प्रमोद धनगर यांनी व्यक्त केली.
दोन दशकांपासून सोनगीर बसस्थानकाचे त्रांगडे सुटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 12:40 IST