धुळे : स्थानिक गुन्हे शाखेच्या नाशिक येथील पथकाने दोन जणांना ताब्यात घेतले़ त्यांच्या चौकशीतून धुळ्यातील दोन भावांना चाकूने भोसकून २५ हजार लुटल्याचे समोर आल्याने त्यांना धुळे शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले़ तपासाधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील यांनी त्या दोघांना नाशिक येथे जावून ताब्यात घेतले़ त्यांना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ दोघेही अमृतसर येथील आहेत़देवपुरातील बडगुजर कॉलनीत राहणारे रुपेश विठ्ठल चौधरी (४८) आणि राजेश चौधरी (५०) या दोघा भावंडाचे मालेगाव रोडवरील रेल्वे क्रॉसिंगच्या पुढे शनीमंदिराजवळ तुलसी टायर नावाचे दुकान आहे. शुक्रवारी सायंकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास रुपेश चौधरी हे दुकान बंद करत असताना ग्राहक बनून दोन जण त्याठिकाणी आले. चारचाकी वाहनाचे टायर विकत पाहीजे अशी मागणी केली. त्यावेळी दुकान बंद झाल्याचे या भावंडांनी सांगितले. दुकान उघडण्याचा दम यावेळी चौधरी बंधुना भरण्यात आला. त्यांनी विरोध करताच एकाने राजेश चौधरी यांच्या हातातील २५ हजार रुपये रोकड असलेली पिशवी हिसकाविण्याचा प्रयत्न केला. राजेश यांच्याकडून विरोध होत असल्याने दुसऱ्याने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. हे पाहून रुपेश हे त्यांच्या भावाला वाचविण्यासाठी धावले असता त्यांच्यावरही चाकूने हल्ला करण्यात आला. त्यांच्या पोटावर आणि हातावर चाकूने वार केल्यामुळे चौधरी बंधू जखमी झाले. तोपर्यंत हे दोन्ही चोरटे २५ हजाराची रोकड घेऊन पसार झाले़ याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता़नवप्रित सिंग आणि मोहीत शर्मा (दोघे रा़ अमृतसर) या दोघांना नाशिक येथील स्थानिक गुन्हे शाखेने एका गुन्ह्यात ताब्यात घेतले़ त्यांची चौकशी सुरु असताना ते मनमाड येथील गुरुद्वारात राहत होते़ गावातच त्यांनी जबरी चोरी केली़ त्यानंतर नगर जिल्ह्यातील राहता येथे दुचाकी चोरीच्या घटनेत त्यांचाच संबंध असल्याचे समोर आले़ चौकशी सुरु असताना धुळ्यातील दोन भांवडांवर चाकू हल्ला करणारे हेच दोघे असल्याचे समोर आल्यानंतर ही माहिती धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना कळविण्यात आली़ तातडीने याप्रकरणाचे तपासाधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील यांनी जावून त्या दोघांना धुळ्यात आणले़ त्यांना न्यायालयात हजर केले असता गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़
धुळ्यातील दोघा भावांना चाकूने भोसकून पळणारे नाशिक एलसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 21:52 IST