दि. १ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास बभळाज गावातील बसस्टॅण्डवर ही घटना घडली. फिर्यादी पंकज राजेंद्र पाटील (वय २६, रा. अजंदे बु़.) व त्याचा मित्र भूषण दिनेश वाघ हे दोघे गाडीत बसले होते. त्यावेळी बभळाज बसस्थानकावर गाडी उभी करून विशाल देवा बंजारा याने पंकजला गाडीतून गळपट्टी धरून खाली ओढून त्यास बेदम मारहाण करू लागला. त्यावेळी पंकजचा मित्र भूषण हा बंजाराला समजविण्यास गेला, त्याचे वाईट वाटून त्यालादेखील मारहाण केली.
यावेळी संशयित आरोपी विशाल देवा बंजारा याच्या सोबत असलेले संदीप वसंत बंजारा, एकनाथ इंद्रसिंग बंजारा, दीपक मधुकर लोहार, भोजू सुरेश पवार. सर्व रा. बभळाज अशा पाचजणांनी त्या दोघांना चेतावणी देत मारहाण केली तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या हाणामारीत जखमी पंकज व भूषण यांचे कपडे फाडून त्यांच्या खिशातील वस्तू गहाळ केल्या.
याबाबत पंकज पाटील याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विरोधात थाळनेर पोलिसांत भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६, ४२७ प्रमाणे दंगलीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास हवालदार कांबळे करीत आहेत.