शहराचा विस्तार झपाट्याने वाढत असल्याने प्रत्येक भागात बाजारपेठा व भविष्यात मोठ्या समूहाचे मॉल धुळ्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आतापासून प्रयत्न करणे गरजचे आहे. त्यासाठी आधुनिक बदल व्यवसाय करावा, असे आवाहन धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग यांनी केले.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रविवारी शहरात धुळे व्यापारी महासंघाचे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष नितीन बंग म्हणाले की, शहराच्या वाढत्या विस्तारामुळे व्यापाराच्या कक्षा ही रूंदावत चालल्या आहेत. पुर्वी बाजारपेठा भागामध्ये मर्यादित होत्या. त्यामुळे ग्राहक मुख्य बाजारपेठेतून खरेदीसाठी प्राधान्य देत होता. मात्र गेल्या चार ते पाच वर्षापासून शहराचे विस्तारीकरण झाल्याने शहरातील वाडीभोकरोड, गाेंदूररोड, दत्तमंदिर चौक, कुमारनगर, पारोळारोड, मालेगावरोड,चाळीसगावरोड, मील परिसर, दूधडेअरी परिसर तसेच रेल्वे स्टेशन अशा विविध भागात स्वतंत्र बाजारपेठा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना घराजवळच वस्तू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न व्यापारी बांधवांकडून केला जात आहे. त्यामुळे किरकोळ व्यापारावर स्पर्धेचे सावट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी आतापासून स्पर्धेत टिकण्यासाठी व्यापारी बांधवांनी बदल करावा. यावेळी नितीन बंग यांनी ग्राहक सेवा, मालाची प्रत, ग्राहकांना विक्री पश्चात सेवेकडे आवश्यक आधुनिक सुविधा तसेच इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा वापर वाढविण्याचे गरज आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मदत होऊ शकते असेही नितीन बंग यांनी सांगितले.