धुळे - जिल्हयात आजपासून ४५ वर्षावरील नागरिकांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी कोव्हीशील्ड लसीचे ३३ हजार ५०० डोस मिळणार असल्याची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिली.
आतापर्यंत एकूण ६५ हजार ३७४ नागरिकांनी लस टोचून घेतली आहे. ५८ हजार ८७ जणांनी पहिला डोस तर ७ हजार २८७ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात फ्रँटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. जिल्ह्यातील १२ हजार ७२ आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला आहे तर ५ हजार ४३६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच ६ हजार ८६६ फ्रँटलाईन कर्मचाऱ्यांनी पहिला तर १ हजार ८५१ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. आता जेष्ठ नागरिकांसोबतच ४५ वर्षवरील नागरिकांनाही लस घेता येणार आहे.
८ लाख डोसची मागणी -
४५ वर्षावरील सर्व नागरिकांना आता कोरोनाची लस घेता येणार आहे. यापूर्वी केवळ जेष्ठ नागरिक व ४५ वर्षावरील व्याधीग्रस्थ नागरिकांना लस घेता येत होती. जिल्ह्यात ४५ वर्षावरील नागरिकांची संख्या ७ लाख २२ हजार इतकी आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने ८ लाख डोसची मागणी राज्य शासनाकडे केली होती. त्यापैकी ३३ हजार ५०० डोस आज उपलब्ध होणार आहेत. टप्प्या - टप्प्याने लस उपलब्ध होणार आहेत. सध्या दररोज ५ हजार डोस लागतात. मात्र आता लसीकरण करणाऱ्या वयोगटातील संख्या जास्त असल्याने प्राप्त होणारे डोस आठवडाभर पुरतील का याबाबत शंका आहे. पुढील टप्प्यातील डोस लवकर मिळाले तरच विना व्यत्यय लसीकरण पार पडेल.
प्रतिक्रिया -
८ लाख डोसची मागणी केली होती. त्यापैकी ३३ हजार ५०० डोस आज प्राप्त होणार आहेत. टप्प्या - टप्प्याने डोस मिळणार आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्रात आठवड्यातून तीन दिवस लसीकरण सुरु असते. त्यादिवशी डोस जास्त लागतात. अन्य दिवशी मात्र लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या कमी असते. त्यामुळे प्राप्त ३३ हजार डोस आठवडाभर पुरतील.
- संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी