पोषण ट्रॅकरवरील कामे
अंगणवाडी सेविका पूर्वी मराठीतून सर्व माहिती भरत होत्या. मात्र आता केंद्र शासनाने एप्रिल २१ पासून ‘पोषण ट्रॅकर’ हे नवीन ॲप विकसित केले आहे. या ट्रॅकरमध्ये नवजात बालकापासून ६ वर्षापर्यंतच्या लहान मुलांची माहिती, गरोदर माता, स्तनदा माता यांची माहिती, त्यांना दिला जाणारा पोषण आहार यांची माहिती इंग्रजीत भरावी लागत आहे. याशिवाय लसीकरणाचीही माहिती द्यावी लागत आहे.
मोबाईलची अडचण वेगळीच
शासनाने सर्व अंगणवाडी सेविकांना यापूर्वीच मोबाईल उपलब्ध करून दिले आहेत. मात्र या मोबाईलची साठवण क्षमता व स्पीड खूपच कमी आहे. काहींचे मोबाईल आउटडेटेड झालेले आहेत. नवीन ॲप डाऊनलोड होत नाही. एखाद्या लाभार्थ्याचे नाव दुसऱ्यांदा टाईप झाले तर ते डिलिट करण्याची सोय नाही. अशा अनेक समस्या आहेत. त्यामुळे सेविकांना स्वत:चा मोबाईल वापरावा लागत आहे.
आम्हाला इंगजी कशी येईल?
अंगणवाडी सेविकांना जे मोबाईल दिलेले आहेत, ते जुने आहेत. नवीन मोबाईल ॲपमध्ये इंग्रजीतून माहिती भरण्याची सूचना केली आहे. मात्र अनेक सेविकांचे शिक्षण दहावीपर्यंतच झालेले आहे. त्यामुळे इंग्रजीत माहिती भरताना अडचणी येत आहेत. यासाठी सेविकांना प्रशिक्षण द्यावे.
- रत्ना पाटील,
अंगणवाडी सेविका
केंद्र शासनाने दिलेले पोषण ट्रॅकर ॲप सदोष आहेत. इंग्रजी न येणाऱ्या सेविकांना त्रयस्थाच्या मदतीने माहिती भरावी लागत आहे. एखाद्या लाभार्थ्याचे नाव चुकून दुसऱ्यांदा भरले गेल्यास ते डिलीट करण्याची सोय नाही. पुन्हा, पुन्हा नवीन डाटा भरावा लागत असतो. सेविकांसाठी मराठीत ॲप असले पाहिजे.
- रेखा पाटील
अंगणवाडी सेविका