लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर : येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात दोन दिवसीय ४१ व्या शिंदखेडा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप १८ डिसेंबर रोजी झाला. यावेळी विविध गटातील २१ विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यात बारा विद्यार्थी व नऊ शिक्षकांचा समावेश आहे.१८ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक संस्थेच्या प्राचार्या डॉ. विद्या पाटील, दोंडाईचाचे अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांच्या उपस्थितीत समारोप झाला. यावेळी ग्रुपचे चेअरमन युवराज सावंत, जिल्हा कार्याध्यक्ष संजय पवार, विज्ञान संघ महानगराध्यक्ष विनोद रोकडे, उपक्रम समिती प्रमुख एस. एस. गोसावी, डी. बी. पाटील, जे.डी. भदाणे, आर.ए. चित्ते, सुधाकर माळी यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.याप्रसंगी मार्गदर्शन करताना सुदाम महाजन यांनी सांगितले की, आदिमानवापासून विज्ञानाचा शोध व प्रगती सुरू झाली आहे.मात्र विज्ञाना बरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवायला पाहिजे. विज्ञान म्हणजे अंधारात केलेली दगडफेक नसते. ज्या गोष्टींचा शोध लावला त्याचा व्यवहारात उपयोग करता आला पाहिजे. युजर्स नव्हे तर क्रियेटर व्हावे. प्राचार्या विद्या पाटील यांनी विद्यार्थ्यांशी मनसोक्त यावेळी व्यासपीठावरून हितगूज केले. विज्ञान प्रदर्शनात परीक्षक म्हणून प्राथमिक गटासाठी सुधाकर नामदेव माळी, दिनेश कौतिक शिरसाठ, नारायण कडू ठाकरे यांनी तर माध्यमिक गटाचे परिक्षण नीलेश किशोर मालपूरकर, सुकलाल माळी, धनराज भीमराव बाविस्कर यांनी केले. माध्यमिक गटातील सर्व उपकरणे जिल्हास्तरावर गेली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.दोन दिवशी या विज्ञान प्रदर्शनाचा समारोप झाला असून ग्रामीण भागातील दडलेला भावी विज्ञानिक बाहेर निघावा त्याच्यातील बाल वैज्ञानिक जागृत व्हावा हा उद्देश असल्याचे सांगितले. शिंदखेडा तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्रदर्शनाच्या निमित्ताने विविध वैज्ञानिक उपकरणे बघण्याची संधी प्राप्त झाली आणि यातुन आपणही काही करू शकतो अशी भावना यावेळी चिमुरड्यांनी यावेळी सांगितले. भारताच्या उज्वल भविष्यासाठी या प्रदर्शनातून ग्रामिण पालकांनी भेट देवून आनंद व्यक्त केला. याचा कृषी क्षेत्रासाठी उपयोग होवु शकतो. हे प्रदर्शन असलेल्या कृषी उपकरणावरुन दिसून आले.हर्षल महाले, अपेक्षा बोरसे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी नारायण भिलाणे सुधाकर माळी यांनीही मनोगत व्यक्त केले. तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष रवींद्र चित्ते यांनी विज्ञान प्रदर्शन यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा थाटात समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 23:26 IST