आॅनलाइन लोकमतधुळे : तालुक्यात पाण्याची स्थिती गंभीर झालेली आहे. ज्या गावांना पाण्याची टंचाई भासत आहे, तेथे पाण्याचे टॅँकर सुरू करावेत. त्याचबरोबर ज्या गावांना वाढीव टॅँकर पाहिजे आहेत, त्यांनीही प्रस्ताव सादर करून पाणी पुरवठा विभागाने ते मंजूर करावेत. पाणी टंचाई निवारणार्थ युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात अशा सूचना धुळे ग्रामीण मतदार संघाचे आमदार कुणाल पाटील यांनी आज प्रशासनाला दिले. दरम्यान चाऱ्याचीही स्थिती गंभीर होऊ लागली असून, चारा छावण्या अथवा चारा डेपो सुरू करावेत अशी मागणीही त्यांनी केली.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर धुळे तालुक्याची टंचाई आढावा बैठक गुरूवारी जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आमदार कुणाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती मधुकर गर्दे, पंचायत समितीचे उपसभापती दिनेश भदाणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी., ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पढ्यार, प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार किशोर कदम, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे , उपअभियंता एन.डी.पाटील,आदी उपस्थित होते.बैठकीच्या सुरवातीला ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता एस.बी. सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी तालुक्यात २३ गावांना २० टॅँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून २६ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. तालुक्यात तीन तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना मंजूर असून त्याचे काम पूर्ण झाले आहे. तर दोन विहिरींचे खोलीकरण पूर्ण झाले असून, चार विहिरींच्या खोलीकरणाच्या कामाला मान्यता मिळाली असल्याचे सांगितले.यानंतर तालुक्यातील प्रत्येक गावाची पाणी टंचाईची माहिती सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडून घेण्यात आली. सरपंच, ग्रामसेवकांनी वाढीव टॅँकरची मागणी केली. तसेच विहिर खोलीकरण, नवीन पाईपलाईन टाकणे, हातपंप दुरूस्तीची मागणी केली.तालुक्यातील अजंग येथे तीन टॅँकरद्वारे सात फेºयास ुरू आहे. गावाला प्रति माणसी २० लिटरप्रमाणे पाणी दिले जात असून, अजंगला आता वाढीव टॅँकर मंजूर होऊ शकत नसल्याचे सांगण्यात आला.मोरदडतांडा येथील वादात असलेल्या पाण्याच्या स्त्रोताऐवजी नवीन पाण्याचे स्त्रोत शोधण्यासाठी नाशिक येथील भुजल तज्ज्ञांना तातडीने बोलविण्याची कार्यवाही करावी तसेच सध्या सुरू असलेल्या टॅँकरच्या फेºया वाढविण्याच्या सूचना दिल्या.सौंदाणे गावासाठीही टॅँकरची संख्या वाढवून मिळावी अशी मागणी करण्यात आली. या गावासाठी राष्टÑीय पेयजल योजनेला मंजुरी मिळाली असल्याचे सांगण्यात आले. सोनगीर येथील पाणी टंचाईच्या निवारणार्थ स्वतंत्र बैठक घेण्याच्या सूचना आमदारांनी दिली. तांडाकुंडाणे येथेही टॅँकरची संख्या वाढवून मिळावी अशी मागणी करण्यात आली.तालुक्यातील सोनगीर व फागणे ही दोन गावे अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करीत आहे. या गावातील पाणी टंचाईवरील उपाय योजनांसाठी स्वतंत्र बैठक घेण्याची सूचना करण्यात आली. दरम्यान ज्या गावांना पाणी टंचाई भासत आहे त्यांनी तसेच ज्या गावांना वाढीव टॅँकर सुरू होणे गरजेचे आहे, तेथील प्रस्ताव तत्काळ सादर करावेत. तसेच प्रशासनानेही त्यास मंजुरी द्यावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.तलाठी, ग्रामसेवकांनी जागृत रहावेतालुक्यात असलेल्या टंचाई संदर्भात तलाठी, ग्रामसेवकांनी जागृत रहावे. गावात पाण्याची टंचाई भासत असल्यास त्यासंदर्भातील प्रस्ताव हातोहात घेऊन यावेत. त्याला तत्काळ मंजुरी दिली जाईल असे प्रांताधिकारी भीमराज दराडे यांनी सांगितले.
धुळे तालुक्यातील पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 11:56 IST
पाणी टंचाई आढावा बैठकीत आमदारांनी दिल्या सूचना
धुळे तालुक्यातील पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना करा
ठळक मुद्देधुळे तालुक्यात तीव्र पाणी टंचाई२३ गावांना २० टॅँकरद्वारे पाणी पुरवठाचारा छावणी सुरू करण्याची मागणी