शिरपूर येथे बैठकीत भूपेशभाई पटेल
शिरपूर येथे बैठकीत भूपेशभाई पटेल
शिरपूर : शिरपूरवासीयांनी डेंग्यू आजारावर मात करण्यासाठी घरोघरी पुरेशी काळजी घ्यावी. डेंग्यू हा खूपच त्रासदायक आजार आहे. स्वच्छ पाण्यावरील डासांमुळे डेंग्यू होत असल्याने सर्वांनी त्याबाबत काळजी घ्यावी. आरोग्यसेवा देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे. लहान मुलेदेखील डेंग्यूमुळे त्रस्त होत असल्याचे राज्यभरात सर्वत्र दिसून येत आहे. घरातील फ्रिज, घराच्या टेरेसवर ठेवलेले टायर, अंगणातील पाण्याची टाकी सर्वांनी स्वच्छ ठेवावी. शक्य झाल्यास अंगाला ओडोमॉस किंवा लिंबाच्या पाल्याचे पाणी हातापायांना लावा. सर्वांनी पुरेशी काळजी घ्या; कारण कोरोना व डेंग्यूसारख्या अनेक आजारांमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक विवंचनेत येऊ शकतात, असे कळकळीचे आवाहन उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी केले.
शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या वतीने आर. सी. पटेल फार्मसी कॅम्पसमधील पटेल ऑडिटोरिअम हॉलमध्ये सोमवारी डेंग्यू जनजागृतीपर बैठक घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, नगर अभियंता माधवराव पाटील, प्रशासकीय अधिकारी संजय हासवानी उपस्थित होते.
उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल पुढे म्हणाले, मी स्वत: मुंबई येथे डेंग्यूचा त्रास भोगला आहे. नगर परिषदेच्या वतीने घरोघरी जाऊन डेंग्यूबाबत जनजागृती सुरू आहे. महिला, पुरुष, सेवाभावी कार्यकर्ते यांनी आपल्या वॉर्डात, आपल्या भागात, संपूर्ण शहरात डेंग्यूबाबत पुरेशी काळजी घ्यावी. नगरपरिषदेच्या सहकार्याने सर्वांनी डेंग्यूवर मात करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले़
माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण म्हणाले, नगरपरिषदेने विविध पथकांमार्फत घरोघरी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीदेखील आशा वर्कर्स भगिनी, महिला यांनीही डेंग्यूबाबत जागृती करायची असून, त्यांनी महिलांना काळजी घेण्याबाबत समजावून सांगावे. डेंग्यू प्रसारबाबत चुकीचे समज आहेत. शहरातील खासगी व मोकळ्या जागामालकांनीही योग्य ती काळजी घ्यावी. प्रत्येक नगरसेवक-सेविका यांनी आपल्या गल्लीत, वॉर्डात जागृती करावी. नगरपरिषदेच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्येही योग्य त्या आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशासकीय अधिकारी संजय हासवानी म्हणाले, अनेक ठिकाणी डेंग्यूची रुग्णसंख्या वाढत आहे. आपल्या घरीच स्वच्छ पाण्यावर डेंग्यूचे डास असू शकतात. नगरपरिषदेमार्फत उपाययोजना सुरू आहेत. तरीदेखील स्वयंस्फूर्तीने आपल्या घरात व परिसरात योग्य ती काळजी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले़