धुळे : शिंदखेडा तालुक्यातील जामफळ प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील शेतकऱ्यांना बाजारभावाच्या चारपट मोबदला मिळावा, या मागणीसाठी तेथील प्रकल्पग्रस्तांचे तेरा दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला अक्कलपाडा धरणग्रस्त कृती समितीने पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांची दखल न घेणाऱ्या प्रशासनाचा त्यांनी निषेधही केला आहे. प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, सुपीक जमीन ही वेगवेगळ्या प्रकल्पांना संपादित केल्याने घटत आहे. घेतलेल्या जमिनीचा मोबदला व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन याबाबतही शासन नेहमीच बेफिकीर असते. शेतकरी आपल्या जमिनीला आईसमान मानतो. ती विकणे त्याच्या जीवावर येते. अनेक ठिकाणी जमिनी संपादनाला विरोध होतो. जामफळ प्रकल्पग्रस्त जमिनी देण्यास तयार आहेत. ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. पण, त्यासाठी नवा भूसंपादन कायदा २०१२ प्रमाणे बाजारभावाच्या चारपट किंमत दिली पाहिजे, ही त्यांची मागणी अत्यंत वाजवी व रास्त आहे. खरेतर या भागात जमीन अत्यंत सुपीक असल्याने चारपट किंमतसुद्धा कमीच आहे. जामफळ प्रकल्पग्रस्तांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. कुठल्याही प्रकल्पामुळे ज्यांच्यावर अन्याय होतो. ही मंडळी एकटेपणाने लढतात व त्याचाच फायदा सरकार घेते. जिल्ह्यात विखरणच्या धर्मा पाटलांचे प्रकरण हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. त्यातून प्रकल्पग्रस्तांनी व सरकारनेही धडा घेतला पाहिजे. म्हणून इतरांच्या अन्यायाच्या वेळीसुद्धा आपण उदासीन न राहता त्यांना साथ दिली पाहिजे. आम्ही अक्कलपाडा प्रकल्पग्रस्त शेतकरीही एकाकी लढलो. त्यावेळेला कदाचित जामफळ प्रकल्पामुळे विस्थापित होत असलेले, निद्रिस्त असावेत. पण आता तरी, त्यांनी आपल्या स्वतःबरोबरच इतरांवरील अन्यायाच्या विरोधातसुद्धा साथ देऊन लढ्याची तयारी ठेवावी, अशी अपेक्षा अक्कलपाडा धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष कॉम्रेड सुभाष काकुस्ते, उपाध्यक्ष गुलाब चव्हाण, चिटणीस श्रीराम पाटील, भरत नेरे यांनी व्यक्त केली आहे.या योजनेतील प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चालले आहे.
जामफळ प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला अक्कलपाडा धरणग्रस्तांचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 19:41 IST