शहरातील जयहिंद शैक्षणिक संस्था संचालित झेड.बी. पाटील महाविद्यालयात रसायनशास्त्र मंडळाचे ऑनलाइन उद्घाटन उपप्राचार्य प्रा. व्ही.एस. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना उपप्राचार्य पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी रसायनशास्त्र मंडळाचे अध्यक्ष तथा विभाग प्रमुख डॉ. व्ही.टी. पाटील यांनी भूषविले. यावेळी रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक व २०० पेक्षा जास्त विद्यार्थी या ऑनलाइन कार्यक्रमात उपस्थित होते.
उपप्राचार्य पवार पुढे म्हणाले की, रसायनशास्त्र शास्त्र मंडळातर्फे विद्यार्थ्यांना नेट-सेट, तसेच इतर स्पर्धा परीक्षांची तयारी तसेच रसायनशास्त्र विषयातील अद्ययावत माहिती मिळावी म्हणून तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यात विद्यार्थ्यांनी नियमितपणे सहभागी झाले पाहिजे. कारण त्या माध्यमातून त्यांना शिक्षण, संशोधन व औद्योगिक क्षेत्रात दैनंदिन होणारी प्रगती व त्यामाध्यमातून उपलब्ध होणारी नोकरी व्यवसायाची संधी याविषयी योग्य माहिती देण्यात येते त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला पाहिजे.
डॉ. व्ही.टी. पाटील म्हणाले की, विभागातर्फे विद्यापीठाचा नियमित अभ्यासक्रम पूर्ण करत असतांनाच विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त व्हावे आणि त्यांच्या आंगी असलेल्या सुप्त गुणांना चालणा मिळावी म्हणून रसायनशास्त्र मंडळातर्फे वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधण्यासाठी महाविद्यालय तसेच रसायनशास्त्र मंडळाच्या माध्यमातून उपयुक्त असे विविध शैक्षणिक उपक्रम आयोजित केले जातात. त्यात विद्यार्थ्यांनी नियमित सक्रियपणे सहभागी झाले पाहिजे, असे सांगितले.
प्रास्ताविक करताना रसायनशास्त्र मंडळाचे सचिव डॉ. पी.एस. गिरासे यांनी मंडळाचे उद्दिष्टे सांगून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रसायनशास्त्र विषयातील जागतिक स्तरावरील माहिती देण्यासाठी वर्षभरात आयोजित केले जाणारे कार्यक्रम, कॅम्पस मुलाखती व महाविद्यालय तसेच विद्यापीठ स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांची सविस्तर माहिती दिली. आभार मंडळाचे सदस्य प्रा.डॉ. व्ही.बी. जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सदस्य प्रा.डॉ. एस.एल. सोनवणे, प्रा.डॉ. एस.एस. पाडवी, प्रा. एस.एस. डंबीर व प्रा. मृणाल मोरे आदींनी परिश्रम घेतले.