गृहपालच्या विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 12:31 PM2019-12-06T12:31:46+5:302019-12-06T12:32:27+5:30

शिंदखेडा मागासवर्गीय विद्यार्थी वसतीगृह : संबंधित अधिकाऱ्यांकडून आश्वासन मिळाल्याने आंदोलन तूर्त स्थगित

Student agitation against landlord | गृहपालच्या विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Dhule

Next

शिंदखेडा : येथील समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहातील गृहपाल जागेवर राहत नाही, महिन्यातून दोन-तीन वेळेसच येतात. याबाबत समाजकल्याण विभागाच्या आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते. मात्र त्याची दखल न घेतल्याने, वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी बुधवारी रात्री अचानक आंदोलनाचा पवित्रा घेतला. रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते. दरम्यान अडचणींचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येईल असे आश्वासन मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.
शिंदखेडा येथील एस. एस.व्ही.पी.एस. महाविद्लयासमोर समाज कल्याण मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृह आहे. या वसतिगृहात आठवी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणारे विद्यार्थी राहतात. या ठिकाणी गृहपाल म्हणून अनिल खैरनार यांची नियुक्ती केली आहे. मात्र गृहपाल हे वस्तीगृहात राहत नाही. महिन्यातून दोन-तीन वेळेस येतात. त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करावी यासाठी वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी समाज कल्याण आयुक्त धुळे यांना ३० नोव्हेंबर रोजी निवेदन दिले होते. परंतु सदर निवेदनाची कुठलीही दखल न घेतल्याने विद्यार्थी यांनी वस्तीगृहाच्या मैदानावर बुधवार ४ डिसेंबर रोजी सायंकाळी धरणे आंदोलन सुरू केले. परंतु सदर बाबतीत समाज कल्याण कार्यालयाच्या आधिकारी यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही. संबधीत गृहपाल यांना वसतिगृहात शासकीय निवासस्थान असून या आवारातच २४ तास हजर राहणे बधनकारक असून असे न करता महिन्यात दोन किंवा तीन वेळेस येतात व मद्यधुंद राहत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. गृहपालच नसल्याने विद्यार्थ्यांनी अडचणी सांगाव्यात तरी कुणाला? आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास कोण जबाबदार राहील? असे एक ना अनेक प्रश्न आहेत. या ठिकाणच्या स्वच्छतेचा ठेका एका खाजगी कंपनीला दिला असून मनमानी पद्धतीने स्वच्छतेचे काम करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. शासनाच्या ध्येय धोरणानुसार कुठल्याच सोयी सुविधा मिळत नाही. जोवर मागण्यांचा विचार होत नाही तोवर आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला होता.
या आंदोलनाची माहिती तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना कळताच त्यांनी शिंदखेडा तलाठी तुषार पवार यांना तात्काळ विद्यार्थ्यांची भेट घेण्याचे आदेश दिले. तलाठी पवार व भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बैसाणे यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे साहेबराव सोनवणे यांनी संबंधित समाजकल्याण आधिकारी यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्याप्रमाणे जिल्हा समाज कल्याण कार्यालयाचे अधिकारी बापू पवार, जयेश गिरासे यांनी वसतिगृहाला भेट दिली व विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. या वेळी वसतिगृहातील वैभव गुरव, अनिकेत शिरसाठ, विकास नगराळे, अश्विन पानपाटील, भीमराव थोरात, राहुल ठाकुर, रवींद्र शिंदे, लखन कोळी, प्रशांत पानपाटील, शुभम देवरे या विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांसमोर समस्या मांडल्या. यावेळी देखील गृहपाल वस्तीगृहात उपस्थित नव्हते. विद्यार्थी गृहपालांशी दूरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु गृहपाल यांचा दूरध्वनी बंद होता.
याबाबत गृहापाल अनिल खैरनार यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की, येथील भोजनाचा ठेका सुनील गिंदोडीया धुळे यांनी घेतला असून तेच जेवण देतात. विद्यार्त्यांनीे जिम साहित्य, सोलर वाटर हिटर, आरो मशीन आदी मागण्यांबात शासनास वेळोवेळी कळवले आहे. येथे कोणीच लिपिक नसून एक होते तेही पदोन्नतीवर धुळे येथे कार्यरत आहेत. येथे शिपाई नसल्याने, आॅफिस कामासाठी व पत्रव्यवहारासाठी मलाच वरिष्ठ कार्यालयात जावे लागते. त्यामुळे मी येथे येत नाही असे विद्यार्थ्यांना वाटते. तसेच लायब्ररीमध्ये एक हजार पुस्तके असून ज्यांनी मागणी केली तर त्यांना पुस्तके देत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Student agitation against landlord

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे