धुळे : सध्याच्या काळात पोटाची भूक भागविण्याऐवजी जिभेचे लाड पुरविण्याची वृत्ती वाढल्याने तिखट आणि मसालेदार पदार्थ खाण्याकडे कल आहे. त्यामुळे अल्सरचा त्रास होत असल्याच्या तक्रारीदेखील वाढल्या आहेत. जिभेवर वेळीच नियंत्रण मिळविले नाही तर अल्सरचा धोका बळावण्याची शक्यता डाॅक्टरांनी व्यक्त केली आहे.
अलीकडच्या काळात वाढलेल्या स्पर्धेमुळे धकाधकीचे आणि धावपळीचे जीवन आहे. वेळेवर आणि योग्य आहार घेण्यास कुणाकडेही वेळ नाही किंवा पाैष्टिक आहाराला महत्त्व दिले जात नसल्याचे चित्र आहे. अशातच नियमित व्यायाम करण्याकडेही दुर्लक्ष होत आहे.
तिखट आणि मसालेदार पदार्थ खाण्यामध्ये शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीणमध्ये प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. अति प्रमाणात तिखट आणि मसालेदार खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. अल्सरमुळे पोटातील आतड्याला, जठरला जखम होते. योग्य उपचार आणि पथ्य केल्यास अल्सर बरा होतो; पण हा आजार त्रासदायक आहे. अति धूम्रपान, तंबाखू, गुटखा, दारुचे सेवन करणे, वेळी, अवेळी मसालेदार तसेच जंक फुडचे सेवन करणे यामुळे अल्सरला आमंत्रण मिळते.
काय आहेत लक्षणे?
पोट दुखणे
मळमळ होणे
भूक मंदावणे
काळी शाैच होणे
ॲसिडिटी वाढणे
पोटात आग होणे
चिडचीड होणे
काय काळजी घेणार?
तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन करू नये. सातत्याने पोटाचा विकार उद्भवल्यास तज्ज्ञ डाॅक्टरांच्या सल्ल्याने वेळीच उपचार घ्यावेत.
भूक लागली नसताना विनाकारण खाणे टाळावे. अल्सर होऊ नये याकिरता पाैष्टिक आणि सकस आहार घेणे आवश्यक आहे. शरिरातील उष्णता नियंत्रणात आणणाऱ्या पदार्थांचे, फळांचे सेवन करावे.
एन्डोस्कोपी केल्यावर अल्सरचे निदान हेाते. यानंतर पातळ औषधे, गोळ्या असे पूर्णत: उपचार घेणे आवश्यक आहे. खासगी तसेच सरकारी दवाखान्यांमध्येही उपचार उपलब्ध आहेत.