सदस्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुसुंबा ग्रामपंचायत सदस्यांची सभा ३० मे रोजी घेण्यात आली. त्यात सुरुवातीला पथदिवे बंद असल्याबाबत वादळी चर्चा झाली. त्यावर पूर्ण चर्चा न करता सरपंच शोभा शिंदे, ग्रामसेवक बी. एच. पाटील यांनी मासिक सभा रद्द केली, तसेच दोन दिवसांनी पुन्हा सभा घेऊ, असे सांगितले.
मात्र, गावात अनेक समस्या असताना त्याबाबत ग्रामसेवकाला वारंवार मासिक सभा घेण्याची विनंती करूनही त्याकडे दुर्लक्ष केले. मूलभूत सुविधा पुरवण्यात ग्रामपंचायत अकार्यक्षम ठरली आहे. महिला शौचालय नादुरुस्त आहे. बेघर वस्तीत पाणी व्यवस्था नाही. गटारीची सुविधा नाहीत. नवीन पाणीपुरवठा योजनेतून बांधकाम केले. १४ वर्षांपूर्वीची नवीन पाण्याची टाकी गळकी असल्याने ती अद्याप भरलेली नाही. काँक्रिटचे रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे सरपंच शोभा शिंदे ह्या मूलभूत सुविधा देण्यास अकार्यक्षम ठरल्या आहेत. मासिक सभा घेणे बंधनकारक असताना सभा न घेता मनमानी पद्धतीने काम करीत आहेत. त्यामुळे त्यांना पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी केली गेली आहे. हे निवेदन कुसुंबा ग्रामपंचायतीचे सदस्य संज्योत किशोर शिंदे, राजश्री गोटन परदेशी, कविता रवींद्र चव्हाण, प्रिया सुनील शिंदे, राजेंद्र मधुकर परदेशी, भालचंद्र छबुलाल जिरे, करण किशन पवार आदींकडून देण्यात आले आहे.