धुळे : अस्मितेच्या संघर्षात साहित्याच्या विविधांगी प्रवाहांनीच राष्ट्रीय ऐक्य व संवेदनशीलता कायम जिवंत ठेवली आहे. साहित्य, माणसाच्या मनाची मशागत करते. माणूसपण घडवते, समकालीन साहित्यानेच इथली माती समताधिष्ठित ठेवली आहे. त्यामुळे आभासी माध्यमातून दूर राहून सकस साहित्य अभिरुची वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा धुळे व आंतरभारतीय अनुसंधान केंद्र, धुळेचे अध्यक्ष प्राचार्य जयपालसिंह सिसोदिया यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पद्मभूषण डॉ. उदित नारायण मानवविकास संसाधन केंद्र, एशियन आंतरराष्ट्रीय विद्यापीठ नवी दिल्ली व सिंधुुरत्न इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने हिंदी दिवसानिमित्त आयोजित एकदिवसीय हिंदी साहित्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सिसोदिया बोलत होते. साहित्य व सामाजिकता या विषयावर विधी सेवा प्राधिकरणाचे आधिव्याख्याता प्रा. पंडित घनःश्याम थोरात यांनी सांगितले की, “सकस साहित्याने सामाजिकतेचे भान कायम ठेवून माणूसपणाचा जागर सतत जागता ठेवला पाहिजे. मुंशी प्रेमचंद यांनी साहित्याने विलक्षण मानवी सौंदर्य जपले. त्याच पाऊल वाटेने प्रत्येक सर्जनशील साहित्यिकांनी आपली प्रतिभा जपावी “असे विचार थोरात यांनी मांडले.
आपल्या विनोदी कवितांनी व राष्ट्रीय एकात्मतेच्या काव्य गायनाने ज्येष्ठ कवी डॉ. रमेश जैन यांनी विडंबनात्मक काव्य सादर करुन मानवी जीवनाचे मूल्य प्रकट केेले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सिंधी साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष सुरेश कुंदनाणी, प्राचार्य अमिर खान, इंग्लिश अकॅडमीचे डी. एम. अहिरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालयीन अधीक्षक बापूसाहेब माळी व सिंधूरत्न इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षक-शिक्षीकावर्ग उपस्थित होता. आभार प्रदर्शन अमोल माळी यांनी केले.