धुळे : महाराष्ट्रासह मुंबई पोलिसांची बदनामी कधीही सहन केली जाणार नाही. काही ठराविक अधिकाऱ्यांना हाताशी धरुन विरोधी पक्ष पोलिसांना बदनाम करुन त्यांचे मनोबल कमकुवत करण्याचे काम करीत आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांनी समर्पण भावनेने, निस्वार्थपणे जीवाची बाजी लावून मुंबईचे रक्षण करण्याचे काम केले आहे. त्यामुळे संकटसमयी काँग्रेस पक्ष पोलीस दलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याच्या भावना महाराष्ट्र काँग्रेसच्या शिष्टमंडळाने व्यक्त केल्या.पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्त्वाखाली कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर बिनबुडाचे आरोप केले आहेत. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने सत्तेच्या लालसेपोटी परमबीर सिंह यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे काम चालविले आहे. काँग्रेस शिष्टमंडळाने सांगितले की, मुंबई पोलिसांचा जगात नावलौकिक आहे. मुंबईतील बॉम्बस्फोट, मुंबईवर झालेला २६/११चा दहशतवादी हल्ला, अतिवृष्टीतील नैसर्गिक आपत्ती आणि कोरोनासारख्या जागतिक संकटात आपल्या जीवाची पर्वा न करता मुंबई आणि मुंबईकरांचे निस्वार्थीपणे रक्षण केले आहे. पोलीस दलाच्या या शौर्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मात्र, विरोधी पक्ष काही ठराविक अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्तेसाठी पोलीस दलाला बदनाम करण्याचे काम करीत आहे. पोलीस दल आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा विरोधकांचा शकुनी डाव काँग्रेस पक्ष हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि पोलीस दलाचा नावलौकीक जपण्यासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच तत्पर असेल, अशी ग्वाही यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व शिष्टमंडळाने दिली.
राज्यात पोलिसांची बदनामी सहन करणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 22:01 IST