कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांवर कोरोना बाधित रुग्णांचा भार वाढला होता. नॉन कोविड विभाग प्रदीर्घ काळापासून बंद होते. तसेच विविध शस्त्रक्रिया थांबलेल्या होत्या. शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना बाधित रुग्णांना भरती केले असल्याने नॉन कोविड रुग्णांची अडचण झाली होती. डोळ्यांच्या शस्त्रक्रिया व इतर सर्व शस्त्रक्रिया ठप्प झाल्या होत्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे शासकीय रुग्णालयात बाधित रुग्णांवर प्राधान्याने उपचार केले जात होते. आता मात्र बाधित रुग्णांची संख्या कमी झाली असल्याने नोन कोविड उपचार सुरु झाले आहेत. हिरे महाविद्यालयात सर्व शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. तसेच जिल्हा रुग्णालयात निर्जंतुकीकरणाचे काम सुरु आहे. त्यानंतर शास्त्रक्रियांना सुरुवात होणार असल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
कोणत्या रुग्णालयात कोणत्या शस्त्रक्रिया सुरु
१हिरे वैद्यकीय महाविद्यालयात मोतीबिंदू, प्रसूतीसह इतर सर्व शस्त्रक्रिया मागील दोन महिन्यांपासून सुरु झाल्या आहेत.
२ कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नॉन कोविड रुग्णांचे हाल झाले होते. महत्वाच्या शस्त्रक्रिया थांबल्या होत्या. आता त्यांना सुरुवात झाली आहे.
३ जिल्हा रुग्णालयात निर्जंतुकीकरण केले जात आहे. मंगळवारपासून प्रसूती व इतर शस्त्रक्रिया सुरु होणार आहेत.
वर्षभरानंतर सुरु होणार ओपीडी
- येथील जिल्हा रुग्णालयातील नॉन कोविड ओपीडी वर्षभरानंतर सुरु होणार आहे. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु असल्याने ओपीडी बंद होती.
- मागील चार दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात एकही रुग्ण दाखल नाही. आता नॉन कोविडचे रुग्ण उपचार घेऊ शकणार आहेत. निर्जंतुकीकरण व स्वच्छतेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
एक वर्षांपासून प्रतीक्षा आता कुठे मुहूर्त मिळाला
हिरे वैद्यकीय महाविद्यालयात शस्त्रक्रियेसाठी नातेवाईकाला दाखल करण्यात आले आहे. त्यासाठी येथे आलो आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने एका वर्षांपासून शस्त्रक्रिया थांबवली होती. आता शस्त्रक्रिया होणार असल्याने आनंद आहे.
- नातेवाईक
नातेवाईकाच्या महत्वाच्या शस्त्रक्रियेसाठी हिरे वैधकीय महाविद्यालयात आलो आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर नॉन कोविड रुग्णांचे मोठे हाल झाले होते. आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने नॉन कोविड रुग्णांना सहज उपचार मिळत असल्याने आनंद आहे.
- नातेवाईक
निर्जंतुकीकरण व स्वच्छता
मागील चार दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात कोरोनाचा एकही रुग्ण दाखल झालेला नाही. त्यामुळे आता नॉन कोविड विभाग सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी रुग्णालयात स्वच्छता व निर्जंतुकीकरण केले जात आहे. निर्जंतुकीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
- डॉ. महेश भडांगे, जिल्हा शल्य चिकित्सक
गरिबांवर कोरोनाशिवाय इतर उपचार झाले कोठे
- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात कोविड व नॉन कोविड विभाग स्वतंत्र करण्यात आले होते.
- हिरे महाविद्यालयात नॉन कोविड विभाग स्वतंत्र झाल्याने गरीब व गरजू रुग्णांना उपचार मिळणे सोपे झाले होते.
- मात्र शस्त्रक्रिया बंद असल्याने रुग्णांची परवड झाली होती.