धुळे :कोरोनामुळे यावर्षी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) प्रवेशाची प्रक्रिया आॅनलाइन सुरू झालेली आहे. १ आॅगस्टपासून सुरू झालेली ही प्रक्रिया १४ आॅगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.नुकताच दहावीचा निकाल जाहीर झालेला आहे. दहावीनंतर अनेक विद्यार्थी आयटीआयला प्रवेश घेत असतात. सध्यातरी आयटीआयची आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे.धुळे जिल्हा आयटीआयच्या २० ट्रेडच्या एकूण १ हजार ६० जागा आहेत. तर ८१ युनिट आहेत.विद्यार्थ्यांना १४ आॅगस्टपर्यंत आॅनलाइन अर्ज करता येणार आहे. त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता यादी १६ आॅगस्ट रोजी जाहीर करून विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. या गुणवत्ता यादीबाबत हरकती व प्रवेश अर्जातील माहितीत बदल १६ व १७ आॅगस्ट रोजी करता येणार आहे. अंतिम गुणवत्ता यादी १८ आॅगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता जाहीर करण्यात येईल.पहिली प्रवेश फेरी २० आॅगस्ट रोजी होणार आहे. त्यानंतर दुसरी, तिसरी व चौथी प्रवेश फेरी होणार आहे. तर जिल्हास्तरीय समुपदेशन फेरी २१ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती शासकीय आयटीयातून देण्यात आलेली आहे.
आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 22:19 IST