आॅनलाइन लोकमतधुळे :‘कोरोना’च्या पार्श्वभूमिवर राज्य शासनाने सर्व शाळा ३१ मार्चपर्यंत बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे लागणार आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून खलाणे येथील जिल्हा परिषद शाळेने ‘लर्न फ्रॉम होम’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला असून, सोशल मीडियाच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम घेण्यास प्रारंभ केला आहे.खलाणे जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असून, शाळेत २७४ विद्यार्थी व ११ शिक्षक आहेत. कोरोनामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळेतील शिक्षकांनी तुकडी निहाय व्हाट्सअप ग्रुप तयार केले आहेत. हा ग्रुप तयार करतांना प्रत्येक पालकांशी व्यक्तिश: संपर्क साधून या उपक्रमाची माहिती देण्यात आली.प्रत्येक वर्ग शिक्षकाने आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा एक होम लर्निंग व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्यावर दररोज नियमितपणे अभ्यास देण्यात येणार आहे. तो अभ्यास पालकांनी विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घ्यायचा आहे. त्यासाठी सकाळी आठ ते दहा या वेळेत पालकांनी आपला मोबाईल व आपण स्वत: बसून पाल्याकडून होम लर्निंग तत्त्वानुसार अभ्यास पूर्ण करून घ्यायचा आहे. या पद्धतीत गट पद्धतीने अभ्यास करावयाचा असल्याने एकमेकांना येणाऱ्या अडचणी विद्यार्थी सोडवू शकतील. तसेच या ग्रुप मध्ये काही ग्रुप अॅडमिन असतील ते शिक्षकांशी संपर्क साधू शकतील. अध्यापनात काही अडचणी आल्या तसेच अभ्यास पूर्ण झाल्यानंतर ग्रुप अॅडमिन किंवा गटप्रमुख त्या दिवसाचा पूर्ण झालेला होमवर्क त्या विद्यार्थ्यांसह नोटबुकचा फोटो आपल्या वर्गाच्या ग्रुपवर सामूहिकपणे शेअर करतील. शिक्षक त्या होमवर्कला लाईक करतील किंवा स्मायली ईमोजी देतील. किंवा मार्गदर्शन करतील. दरम्यान ज्यांच्याकडे मोबाईलची सुविधा नाही, अशा विद्यार्थ्यांना ज्यांच्याकडे अॅन्ड्रॉइड मोबाईल आहेत ते सहकार्य करणार आहेत.प्रत्येक तुकडीचा एक ग्रुप याप्रमाणे दहा ग्रुप तयार झालेत. या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक हे शाळा बंदच्या काळात एकमेकांच्या संपर्कात राहणार आहेत. संकल्पना राकेश पाटील या शिक्षकाने अंमलात आणलेली आहे. या उपक्रमासाठी भास्कर शिरसाट,भालेराव बोरसे, राजेंद्र पाटील, अतुल खोडके, विद्या जाधव, ज्ञानेश्वर तवर, जयश्री गीते, कैलास वाघ, शितल चव्हाण यांच्यासह विद्यार्थी व त्यांचे पालकांचेही सहकार्य लाभत आहे. दरम्यान मुख्याध्यापक चंद्रकांत डिगराळे हे समन्वयकाची भूमिका पार पाडत आहेत.
विद्यार्थ्यांसाठी ‘लर्न फ्रॉम होम’ उपक्रमाची सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 11:52 IST