धुळे : चालकांसाठी प्रशिक्षण, गाड्यांची वेळोवेळी करण्यात येणारी दुरुस्ती, आगारांमध्ये नवीन गाड्यांचा समावेश यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगारात अपघातांमध्ये घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहेत. असे असले तरी अनेक प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सलाच प्राधान्य देत आहेत.
दुचाकी, चारचाकी, खासगी प्रवासी गाड्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. असे असले तरी अनेकजण एस.टी. महामंडळाच्या बसनेच प्रवास करण्यास प्राधान्य देत असतात. वाहनांच्या गर्दीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे, त्याला एस.टी.ही अपवाद राहिलेली नाही. मात्र, इतर खासगी प्रवासी वाहनांच्या तुलनेत एस.टी.च्या अपघातांची संख्या कमी आहे.
स्पर्धेत टिकण्यासाठी एस.टी.तही आमूलाग्र बदल झालेले आहेत. मात्र, केवळ आरामदायी प्रवासामुळेच लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी खासगी बसनेच प्रवास करतात. शिवाय एस.टी. अनेक स्थानकावर थांबत असते. त्यामुळे वेळ भरपूर लागतो, तर ट्रॅव्हल्स ठरावीक ठिकाणीच थांबत असते. शिवाय स्वच्छतेच्या बाबतीत एस.टी.पेक्षा ट्रॅव्हल्स अधिक सरस असते. त्यामुळे तिकीट दर जास्त असले तरी अनेकजण ट्रॅव्हल्सने प्रवास करतात. परंतु, अपघात झाल्यानंतर एस.टी.च्या प्रवाशाला जी तत्काळ मदत मिळते, ती ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्याला मिळत नाही.
एसटीला स्पीडलाॅक, ट्रॅव्हल्स मात्र सुसाट
एस.टी.ची गती जास्त वाटत असल्यास, एसटीला स्पीडलाॅक बसविण्यात येत असतो. त्यामुळे एसटीची गती मर्यादित ठेवण्यात येत असते. ट्रॅव्हल्सला गतीचे कुठलेही बंधन नसते. त्यामुळे एसटीच्या तुलनेत ट्रॅव्हल्स अतिशय सुसाट वेगाने धावताना दिसतात. धुळे आगारातील बसेसची नेहमीच गती तपासली जात असते.
अनुभवी चालक
बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत. विमा योजना आहे. बसचा अपघात झाल्यास प्रवाशाला तत्काळ मदत दिली जाते. आजारावर होणाऱ्या खर्चाची प्रतिपूर्ती रक्कम प्रवाशाला दिली जाते. एस.टी. महामंडळाचे चालक हे प्रशिक्षणार्थी असतात. एकच चालक अनेक मार्गावर वाहन चालवीत असतो. त्यामुळे त्याचा रस्त्याचा अभ्यास झालेला असतो. त्याचा वाहन चालविण्याचा चांगला अनुभव असतो. इतर खासगी वाहनांच्या तुलनेत एस.टी.चा प्रवास हा अतिशय सुरक्षित आहे.
- स्वाती पाटील,
आगार प्रमुख धुळे.
एस.टी.चा प्रवास सुरक्षित आहे. मात्र, एस.टी.मध्ये स्वच्छता नसते. ती अनेक ठिकाणी थांबत, थांबत जाते. यामुळे वेळेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. आरामदायी प्रवासासाठी ट्रॅव्हल्सनेच प्रवास करतो.
- स्वप्निल कुळकर्णी
प्रवासी
एस.टी.ने प्रवास करणाऱ्या वृद्ध प्रवाशांना तिकीट दरात सवलत मिळत असते. खासगी बसमध्ये ही सुविधा मिळत नाही. शिवाय एस.टी. ग्रामीण भागात जाते, खासगी बस जात नाही. त्यामुळे एसटीनेच प्रवास करण्यास प्राधान्य देतो.
- शांताराम पाटील
प्रवासी