धुळे - जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा कहर सुरु झाला आहे. मार्च महिन्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येचा विस्फोट झाला आहे. आतापर्यंत मार्चमध्ये तब्बल ८ हजार ७४१ रुग्ण आढळले आहेत. २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ५ हजार ५५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मार्च महिन्यात कोरोनाचा आलेख वाढला आहे. महिना संपायला अजून दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या महिन्यात आढळलेल्या बाधित रुग्णांची संख्या १० हजारांवर जाऊ शकते. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर एका महिन्यात आढळलेली ही सर्वोच्च रुग्णसंख्या आहे. यापूर्वी मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळले होते. मात्र मार्च महिन्यात आतापर्यंतचे रुग्णवाढीचे सर्व विक्रम मोडले आहेत. कोविड रुग्णालय व कोविड केअर केंद्रातील ऑक्सिजन बेड कमी पडू लागले आहेत. कोविड केअर केंद्रातील बेड वाढवण्यात येत आहेत. तसेच कोरोनाची साखळी तुटावी यासाठी ५६ तासांचा जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. मात्र काही नागरिक अजूनही बेजबाबदारपणे वागताना दिसत आहेत. त्यामुळेच रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
८ हजार ७४१ रुग्ण आढळले -
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १५ हजार ७४९ इतकी होती. १ मार्च ते २७ मार्च या कालावधीत ८ हजार ७४१ रुग्ण आढळले असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २४ हजार ४९० इतकी झाली आहे. तर या कालावधीत ५ हजार ५२३ रुग्ण बरे झाले आहेत. २८ फेब्रुवारी रोजी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १४ हजार ६१६ होती. तर २७ मार्च २० हजार १३९ रुग्ण बरे झाले आहेत.
धुळे शहरातील १० तर ग्रामीण मधील १३ मृत्यू -
मार्च महिन्यात संख्येबरोबरच मृतांचीही संख्या वाढली आहे. एकूण २३ कोरोना बाधित रुग्णांचा महिनाभरात मृत्यू झाला. त्यात धुळे शहरातील १० तर ग्रामीण भागातील १३ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ४१५ रुग्ण कोरोनाने दगावले आहेत. त्यात, धुळे शहरातील १८४ तर उर्वरित जिल्ह्यातील २३१ रुग्णांचा समावेश आहे.