धुळे जिल्ह्यातील दैनंदिन वाढती रुग्ण संख्या, उपलब्ध बेडची संख्या, ऑक्सिजन व औषधांचा पुरवठा याची स्थिती पाहता आरोग्य यंत्रणेवर मोठया प्रमाणात ताण पडत आहे. तसेच अत्यावश्यक सेवा आणि सूट असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात अनावश्यकरीता घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुट दिलेल्या बाबींमध्ये आणखी निर्बंध लागू केले आहेत.
वेळेच्या निर्बधासह चालू असलेल्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत : किराणा दुकाने, भाजीपाला विक्री, फळे विक्री, दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री, बेकरी, मिठाईची दुकाने, सर्व प्रकारची खाद्य दुकाने (अंडी, मटन, चिकन, मत्स्य, पोल्ट्री), कृषी संबंधित सर्व सेवा, दुकाने, उत्पादने, पशुखाद्य विक्री, पाळीव प्राणी यांचे खाद्य दुकाने, पावसाळा ऋतू संबंधित माल व उत्पादने पुरविणारी दुकाने वेळ सकाळी ७ ते सकाळी ११ पर्यत सुरु राहतील. तसेच सदर दुकानांमार्फत घरपोच सेवा पुरविण्यास सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत परवानगी राहील.
या आदेशात नमूद नसणा-या इतर सर्व बाबीकरीता १४ एप्रिलरोजीचे आदेश लागू राहतील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था, अथवा संघटना महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम २०२० च्या नियम ११ नुसार भारतीय दंड संहिता (४५ चे १८६०) कलम १८८ मधील तरतुदीनुसार व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ आणि साथरोग अधिनियम १८९७ मधील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाईस पात्र राहील असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.