शिवसेनेने खांदेपालट करीत जिल्ह्यात पक्षबांधणीला एकप्रकारे सुरुवात केली आहे. पक्षातील चखांदेपालटचा निर्णय हा जिल्ह्यात आगामी सहा महिन्यांत होऊ घातलेल्या दोंडाईचा, शिरपूर नगरपालिका आणि साक्री नगरपंचायत निवडणुका दृष्टिकोनात ठेवूनच केलेला गेलेला आहे. हा निर्णय योग्य होता की नाही, हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.
पक्ष बांधणीच्या दृष्टिकोनातून पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सुरू केलेल्या राज्यातील जिल्ह्याच्या दौऱ्याची सुरुवात धुळ्यापासून केली. त्यांच्या दौऱ्यात बैठकीबाहेर त्यांनी ज्या लोकांच्या भेटीगाठी घेतल्या त्यावरून महानगरात बदल होतील, असे संकेत मिळाले होते. खांदेपालटच्या प्रक्रियेला खऱ्याअर्थाने तेव्हापासूनच सुरुवात झाली होती. महानगरात पूर्वविभाग महानगरप्रमुख पदाची जबाबदारी मनोज मोरे यांना दिली, तर पश्चिम विभाग महानगरप्रमुख पदाची जबाबदारी सतीश महाले यांना देण्यात आली. या नियुक्तीमुळे सतीश महाले हे एकदा पुन्हा शिवसेनेत सक्रीय झाले. हे दोन्ही राष्ट्रवादीसुद्धा एकत्र होते. त्यामुळे दोघेही एकमेकाला चांगल्या पद्धतीने ओळखतात आणि दोघांना एकमेकांच्या काम करण्याची पद्धत माहिती आहे. मनोज मोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कामाला सुरुवातदेखील केली आहे. त्यानी अनेक मुद्द्यावरून मनपात सताधारऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे सतीश महाले यांचे पश्चिम विभागात चांगले काम आहे. ते स्वत: त्यांच्या पत्नी आणि त्यांनी अन्य नगरसेवक निवडूनही आणले आहेत. गेल्या महापालिका निवडणुकीत ते सक्रिय नव्हते. आता ते सक्रिय झाले आहे. त्या भाजपच्या पश्चिम भागातील नेत्यांसमोर एक चांगले आव्हान उभे करू शकतील. या दोघांना उपसंपर्क प्रमुख म्हणून महेश मिस्तरी यांची साथ मिळणार आहे. महेश मिस्तरी हे माजी नगराध्यक्ष आहेत. त्यांची ताकद ही दोघांसाठी बुस्टर डोस ठरू शकतो.
धुळे व साक्री विधानसभा मतदारसंघाच्या ग्रामीण जिल्हाप्रमुख पदाची धुरा ही साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांचे पती डाॅ. तुळशीराम गावित यांच्याकडे सोपविली आहे. आगामी साक्री नगरपंचायत निवडणुकीत नाना नागरे यांना त्याची मदत मिळेल.
आगामी सहा महिन्यांत दोंडाईचा आणि शिरपूर नगरपालिका निवडणुका होणार आहे. शिवसेनेचा या भागात शिंदखेडा तालुका ग्रामीण परिसर सोडला तर शिरपूर व दोंडाईचा शहरात पाहिजे तेवढा नाही. त्यामुळे या दोन्ही नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे अस्तित्व प्रभावीपणे दिसावे त्यादृष्टिकोनातून गेल्या सहा वर्षांपासून धुळे ग्रामीण जिल्हाप्रमुख पद सांभाळणारे हिलाल माळी यांना या दोन्ही विधानसभा मतदारसंघासाठी सह संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी देऊन पक्षाने त्यांचे एकप्रकारे प्रमोशन केले आहे. पण माळी यांना पक्षाने ही जबाबदारी देऊन धुळे शहर व ग्रामीण भागापासून लांब ठेवले असल्याचेही सांगितले जात आहे. परंतु धुळे ग्रामीणमध्ये आणि साक्री तालुक्यात हिलाल माळी यांनी गेल्या सहा वर्षांत कट्टर शिवसैनिक म्हणून काम केले आहे, हे सर्वच जाणतात. ते कडवे शिवसैनिक आहे. त्यामुळे ते त्याच हिरीरीने आणि कडवा शिवसैनिक म्हणून ते आता या ठिकाणीही काम करतील आणि या दोन्ही विधानसभा मतदारसंघात जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांना सोबत घेऊन मजबूत पक्ष बांधणी करतील आणि पक्षाने नव्याने दिलेल्या संधीचे सोनं करतील, अशी पक्षश्रेष्ठींची अपेक्षा आहे, असेही सांगितले जात आहे.